लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा ताफा रोखण्याचा व वाहनांवर सोयाबीन टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून येथील पंचवटी चौकात झाला. शुक्रवारी सकाळी ११:३० च्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, यासह अन्य घोषणांनी चौक दणाणून गेला. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत प्रदेशाध्यक्षांचे जल्लोषात स्वागत केले.
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने असल्याने तगडा पोलिस बंदोबस्तदेखील पंचवटी चौकात होता. दरम्यान, चव्हाण यांचे आगमन होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत करत घोषणाबाजी केली. त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करत चव्हाण यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रदेशाध्यक्षांसह खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या वाहनावरही सोयाबीन फेकण्याचा प्रयत्न केला. ना. रवींद्र चव्हाण यांचे शुक्रवारी सकाळी शहरात आगमन झाले. पंचवटी चौकात त्यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच वेळेस अमरावती तालुका काँग्रेसनेशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचवटी चौकातील डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळून येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले होते.
स्वागतानंतर दिला पोलिसांना गुंगारा
भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या स्वागत कार्यक्रमादरम्यान भाजप व कॉग्रेस कार्यकर्ते आमनेसामने येऊ नये, यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र ताफा पोहोचताच दोन्ही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. चव्हाण यांचा ताफा निघत असताना काहींनी पोलिसांना गुंगारा दिला.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
पावसासह अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत घसरण व डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी प्रहार पक्षाद्वारे शुक्रवारी करण्यात आली व मागण्यांचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतप्त
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केल्याने माजी प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतप्त झाले. प्रदेशाध्यक्षाचे वाहन अडविणे, सोयाबीन फेकणे ही काँग्रेस पक्षाची कृती योग्य नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन घ्यायला बोलावले असते तर मी स्वतः आलो असतो, ज्या कार्यकर्त्यांनी वाहन अडविण्याचा प्रकार केला, त्यांच्यावर कारवाईबाबत पोलिस आयुक्तांना सांगणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
Web Summary : Congress workers in Amravati tried to block BJP leader Ravindra Chavan's convoy, demanding farmer loan waivers. BJP supporters countered with cheers. Tensions rose, prompting a police presence. Later, a demand for drought declaration was submitted to Minister Chandrashekhar Bawankule, who condemned the convoy obstruction and promised action.
Web Summary : अमरावती में कांग्रेस कार्यकर्ताओं ने भाजपा नेता रवींद्र चव्हाण के काफिले को रोकने की कोशिश की, किसान ऋण माफी की मांग की। भाजपा समर्थकों ने जवाबी नारे लगाए। तनाव बढ़ने पर पुलिस तैनात की गई। बाद में, मंत्री चंद्रशेखर बावनकुले को सूखा घोषित करने की मांग सौंपी गई, जिन्होंने काफिले को बाधित करने की निंदा की और कार्रवाई का वादा किया।