कंत्राटदार चा हेकेखोरी विरुद्ध नागरिक रस्त्यावर ;
अपघाताला आमंत्रण
फोटो पी ३० चांदूरबाजार
चांदूर बाजार - तालुक्यातून जाणारे आणि तालुक्याशी जोडणारे सारे रस्ते खड्ड्यांचे झाले आहेत. शहरातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग गेला असून या मार्गाचे काम संथ गतीने सुरू शहरात खड्ड्यांचेच रस्ते झाले असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरून दिवसाला शेकडो वाहनांची वर्दळ असते. गेल्या सहा महिन्यांपासून हे रस्ते खड्ड्यांचे झाले आहेत. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांतून मार्ग काढत वाहतूक करावी लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट एचजी इन्फ्रा या कंपनीने घेतले आहे. मात्र, शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदाराच्या मनमर्जीने बांधला जात असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतूक करावी लागत आहे. या खड्डेमय रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राटदार कंपनीकडून नियोजनशून्य काम सुरू असून, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे. याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. कंत्राटदारातर्फे राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम जागोजागी खंडित अवस्थेत आहे.
गेल्या २० दिवसापासून बंद पडलेल्या कामामुळे नागरिकांना कंत्राटदाराच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागले. शहरातील नागरिकांनी एचजी इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांची हवा सोडून निषेध केला. यामुळे अरेरावी करीत असलेल्या कंत्राटदार कंपनीचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ एकतर्फी रस्त्याची वाहतूक सुरू केली आहे. मात्र, रस्त्याचा दुसऱ्या बाजूचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
-----------------
चालकांची तारेवरची कसरत
कोट्यवधी रुपयांच्या रस्ता बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांची हवा सोडताच २० दिवसांपासून बंद असलेला रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झाले नसल्याने याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील परतवाडा मार्ग, बाबासाहेब आंबेडकर बालोद्यानसमोर तसेच राज्य महामार्गावर बेलोरा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. या भागातून वाहन नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.