रेशनकार्डधारकांच्या यादीत बोगस लाभार्थी!
By Admin | Updated: May 8, 2014 00:46 IST2014-05-08T00:46:53+5:302014-05-08T00:46:53+5:30
शासकीय स्वस्त धान्य दुकानांमध्ये नोंदणी झालेले बरेच रेशनकार्डधारक बोगस असल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे ..

रेशनकार्डधारकांच्या यादीत बोगस लाभार्थी!
पुन:सर्वेक्षणाची मागणी : खर्या लाभार्थ्यांनाच मिळावा लाभ
मोर्शी : शासकीय स्वस्त धान्य दुकानांमध्ये नोंदणी झालेले बरेच रेशनकार्डधारक बोगस असल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि बोगस लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
शासकीय स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना विविध योजनेंतर्गत धान्य पुरवठा केला जातो. तालुक्यात ग्रामीण भागात शेजारी राज्यातून मोलमजुरी करुन चरितार्थ चालविण्याकरिता आलेल्या शेतमजुरांची नावे नोंदविण्यात आली. अनेकप्रसंगी असे शेतमजूर स्थलांतर करुन दुसर्या गावी निघून जातात. अशा ठिकाणी पुन्हा त्यांच्या नावाने रेशन कार्ड तयार केले जाते, पूर्वीच्या गावातील त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जात नाही. त्यामुळे एकाच लाभार्थ्यांच्या नावाने दोन्ही ठिकाणी धान्याचे आवंटन शासनाकडून केले जाते. स्वस्त धान्य दुकानदाराने खरे तर गाव सोडून निघून गेलेल्या लाभार्थ्यांचे नाव कमी करण्याविषयी सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित स्वस्त धान्य दुकानदार अशा लाभार्थ्यांच्या नावे आलेल्या धान्याचा काळाबाजार करतो. याशिवाय निकषात न बसणार्यांचा समावेश लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आल्याचीही चर्चा आहे. या सर्व प्रकाराला स्वस्त धान्य दुकानदार मुख्यत्वे करून जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.
अंबाडा येथील तरुणाने पाळा, गणेशपूर आणि अंबाडा येथील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांची यादी प्राप्त करुन घेतली. त्याने तपासणी केल्यावर बर्याच बोगस लाभार्थ्यांची नावे यादीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांचे पुन:सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)