अमरावती - मध्य प्रदेशातून ट्रकने आणलेल्या लाकडासोबत दुर्मीळ प्रजातीचा साप आला. स्थानिक हमालपुरा येथील आरा गिरणीच्या गोदामात ट्रक खाली करताना हा साप गुरुवारी निदर्शनास आला. हेल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सापाला पकडून मेळघाटच्या जंगलात सोडले.
आरा गिरणीच्या संचालकाने मध्यप्रदेशातून लाकडे बोलावली होती. ट्रकने आणलेली लाकडे गोदामात ठेवताना कामगारांना लाकडाखाली साप दिसला. हेल्प फाऊंडेशनचे रत्नदीप वानखडे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी सहकाऱ्यांसह क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठून साप पकडला.
ट्रकमधून पकडलेला साप हा दुर्मीळ रुका प्रजातीचा आहे. दोन फुट लांबीचा हा साप बिनविषारी असल्याचे रत्नदीप वानखडे यांनी सांगितले. त्याला इंग्रजीत ब्राँझबॅक ट्री स्नेक असे नाव आहे.
अमरावती वनविभागाच्या विभागीय कार्यालयात सापाची नोंद करण्यात आली. तो मेळघाटसह मध्यप्रदेशातच आढळतो. विदर्भातील उष्ण वातावरणात तो जगू शकणार नसल्याचे वास्तव वनअधिकाऱ्यांनी मांडल्यानंतर त्याला परतवाडाच्या जंगलात सोडण्याची परवानगी घेण्यात आली. हेल्प फाऊंडेशनचे संकेत ठाकूर, प्रज्ज्वल वर्मा, कुणाल मेश्राम, कादंबरी चौधरी, सुमेध गवई, संकेत राजूरकर, उमंग गवई, गजानन अटाळकर यांनी त्याला परतवाड्याच्या पुढे नैसर्गिक अधिवासात सोडले.