पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:50 IST2018-08-23T17:49:54+5:302018-08-23T17:50:19+5:30
यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत.

पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित
अमरावती - यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने ८०७ गावे बाधित झालीत. यामध्ये ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ नागरिक बेघर झालेले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ६८,८३८ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विभागात सद्यस्थितीत अकोला, वाशीम जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात पावसाचीे सरासरी माघारली आहे. सरासरीच्या ८ टक्के पाऊस जास्त झाला. यामध्ये नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे व वीज पडल्याने ३० नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे ८०७ गावांत ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८०८ कुटुंबातील १३९, अकोला जिल्ह्यात ७६२ कुटुंबांतील ३,०४८ व यवतमाळ जिल्ह्यात २,२१६ कुटुंबांतील ४,७८५ व्यक्ती बाधित झाल्यात. या कालावधीत ३० नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ १२, बुलडाणा ४, व वाशिम जिल्ह्यात ६ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ११, अकोला ६,अमरावती ५,बुलडाणा १ व वाशीम जिल्ह्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ६८,४३८ हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेली, तर अकोला जिल्ह्यात ४,६०४, बुलडाणा १.१० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यातील २९ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मृताच्या वारसांना ९६ लाखांची मदत
यामध्ये २४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ९६ लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ १०४ जनावरे मृत झाली. यापैकी १५ प्रकरणांत ४.३८ लाखांची मदत देण्यात आली. २०४ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी २८ प्रकरणात १.०५लाखांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी ९ जनावरे दगावलीत.
आपत्तीमध्ये ९,९५८ घरांची पडझड
या नैसर्गिक आपत्तीमध्ये २५१ घरांची पूर्ण, १४२६ घरांची अंशत:, ९१५८ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ४ लाखांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे १४ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने १० व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ६ व्यक्ती अशा ३० नागरिकांचा बळी गेला.