आयएफएस अधिकाऱ्यांची पदोन्नती की खुर्चीचे वजन वाढले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:57 IST2026-01-05T12:54:57+5:302026-01-05T12:57:44+5:30
राज्याच्या वनविभागामध्ये सुरू आहे मनमर्जी कारभार : आयएफएस लॉबीची चलती

Promotion of IFS officers or increase in the weight of the chair?
गणेश वासनिक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या वनविभागामध्ये आयएफएस अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार बघावयास मिळत असून, मनमर्जीनुसार पदाच्या अपग्रेडशनमध्ये हवा तसा बदल केला जात आहे. बदली आणि पदोन्नतीमध्ये चक्क शासनाच्या डोळ्यांमध्ये चक्क धूळफेक केली जात आहे.
राज्याच्या वनविभागामध्ये शासन आदेशाला बगल देत महाराष्ट्रातील आयएफएस अधिकाऱ्यांनी बदली आणि पदोन्नती मिळविताना सोयीचे आणि आरामदायी ठिकाण मिळावे, यासाठी सहज पोस्टिंग होत असल्याचे चित्र आहे. सध्या वनविभागामध्ये रोपवनाची कामे बंद आहेत. वाहनांना इंधन नाही, बिबट व मानव संघर्ष कमालीचा वाढला आहे. अनेक पदे रिक्त असून वनमजुरांचे पगार काही महिन्यांपासून मिळालेले नाही. वनविभागाचे नियंत्रण, व्यवस्थापन आणि नियोजन आराखडा राबविण्याची जबाबदारी असणारे राज्यातील आयएफएस अधिकारी पोस्टिंगची सोयी करण्यात मश्गुल असल्याचे दिसून येते.
वनविभागांमध्ये बोजवारा उडाला सध्या वनविभागातील अधिकारी निवांतपणाचा आनंद घेताहेत. कारण वनविभागामध्ये गेल्या ३ वर्षांपासून योजनेअंतर्गत रोपवन आणि रोपवनाची कामे पूर्णतः ठप्प आहेत. सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुठलेही कामे सध्या तरी दिसून येत नाहीत. अशावेळी शासनाचा निव्वळ वेतनावर खर्च होताना दिसून येत आहे. त्यामुळे जंगलवाढीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे आयएफएस अधिकारी मनमर्जीप्रमाणे पदे खाली-वर करताना दिसून येतात. सध्या वनविभागाची अवस्था बिकट बनलेली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांत धूळफेक गेल्या काही वर्षांपासून आयएफएस अधिकारी पोस्टिंग व बदली पदोन्नतीमध्ये वाट्टेल ते ठिकाण सहज मिळवीत असल्याने वनविभागावर वनमंत्र्यांचे नियंत्रण नसल्याची बाब निर्दशनास येते. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करतेवेळी कुणाला कुठली पोस्टिंग द्यावयाची याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात, मात्र वनविभागातील आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करतेवेळी बदली यादीवर कटाक्ष न टाकता स्वाक्षरी करतात काय? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, आयएफएस अधिकारी हवं तेव्हा पदांमध्ये बदल करतात. अनेक आयएफएस एकाच ठिकाणी ५ वर्षांपासून ठाण मांडलेले दिसतात.
वनविभाग आयएफएसच्या हातचे बाहुले सध्या महाराष्ट्राचा वनविभाग आयएफएस यांच्या हातचे बाहुले बनलेले आहे. गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील ७ आयएफएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. डॉ. रविकिरण गोवेकर यांना यामध्ये मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक मंत्रालयामध्ये अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक करण्यात आले आहे. वास्तविक बघता हे पद मंत्रालयात नसते, तरी निर्माण करण्यात आले. तसेच, श्रीलक्ष्मी अनाबथुला यांना नागपुरात कायम ठेवले.
विवेक होशिंग यांच्यासाठी पुण्यात आहे तिथेच जागा तयार केली. तसेच जी. गुरुप्रसाद कोल्हापूर, चंद्रशेखरन बाला नागपूर, टी. ब्युला एलील मती आणि गिन्नी सिंह यांना ज्या खुर्चीवर यापूर्वी होते तेथेच पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये महत्त्वाचे आयएफएस अधिकाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. तेव्हा सदर पद हे त्यांच्यासाठी कमी ग्रेडचे केले. आता त्यांची पदोन्नती होताच ते अपग्रेड करण्यात आले आहे, हे विशेष.