सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले, उत्पादक शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:01 IST2021-08-26T05:00:00+5:302021-08-26T05:01:03+5:30
शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे मागितली जात आहे. कोथिंबीर आणि पालकाची याहीपेक्षा वाईट अवस्था आहे. मोठ्या श्रमाने उत्पादित केलेली कोथंबीर आणि पालक दोन ते तीन रुपये गड्डीप्रमाणे मागितले जात आहे.

सर्वच भाजीपाल्याचे भाव गडगडले, उत्पादक शेतकरी हवालदिल
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाला बाजारपेठेत यायला लागताच सर्वच भाजीपाल्यांचे दर शेतकऱ्यांकरिता गडगडले आहेत.
राबराब राबून शेतात उत्पादित केलेला भाजीपाला, उत्पादन खर्च तर सोडा तोडायला ही परवडत नाही. पालक, कोथंबीर शेतातच खराब होत आहे. अनेकांनी शेतातील वांगी, भेंडी, हिरव्या मिरचीची तोडाई बंद केली आहे. शेतातच वांगी, भेंडी, पालक कोथंबीरसह अन्य भाजीपाला सडत आहे. कवडीमोल भावात हा भाजीपाला व्यापारी दलाल मागत आहे. यात येणाऱ्या रकमेपेक्षा तोडाईचा खर्च शेतकऱ्याला चौपट लागत आहे.
शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे मागितली जात आहे.
कोथिंबीर आणि पालकाची याहीपेक्षा वाईट अवस्था आहे. मोठ्या श्रमाने उत्पादित केलेली कोथंबीर आणि पालक दोन ते तीन रुपये गड्डीप्रमाणे मागितले जात आहे. काही प्रसंगी ही कोथिंबीर आणि पालक कुणी घ्यायलाही तयार होत नसल्यामुळे शेतकऱ्याला ती सोडून जावे लागते. प्रसंगी ही कोथिंबीर, पालक जनावरांना खायला टाकावी लागत आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला बाजारपेठेत विकताना त्याचे भाव अत्यल्प असते. २० किलो भेंडीचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जाते. काटा हमाली आणि कमिशन हे वेगळेच. कोथिंबीर, पालक, चवळी, दोडके यासह अन्य भाजीपाल्यांचीही तीच गत आहे.
- सुनील कडू
शेतकरी, जवळापूर
तोडाई, वाहतूक, कट्टे आणि बारदाना हा खर्च शेतकऱ्याला खिशातून खर्च करावा लागत आहे. जवळापूर, पथरोट परिसरात जवळपास पाचशे एकर हिरव्या वांगीची लागवड आहे. भाव गडगडल्यामुळे वांग्याची तोडाई बंद झाली. शेतकऱ्यांच्या शेतातच ही वांगी सडत आहेत.
- आसिफ मोहम्मद,
शेतकरी, पथ्रोट
मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात खरेदी नाही. एक किंवा दीड दिवसानंतर शिळा भाजीपाला कुणी विकत घेत नाही. यातच बाहेरून येणारा भाजीपाला आहे. पावसामुळे गुणवत्ताही कमी-अधिक होते. यामुळे शेतकरी ते ग्राहक भावात फरक असतो.
- दीपक चंदेल,
व्यापारी अचलपूर
ग्राहकांना परवडेना
अत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करणारे विक्रेते ग्राहकांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करून देत नाहीत. २० रुपये पावाप्रमाणे कोथिंबीर घ्यावी लागते. ४० रुपये किलोच्या खाली कुठलीही भाजी ग्राहकांना मिळत नाही. या महागड्या भाज्या हातमजुरी करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या नाहीत.
- संजय वानखडे, ग्राहक, कांडली
बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. आलू वगळता कुठलाही भाजीपाला २० रुपये किलोत ग्राहकांना मिळत नाही. बाजारात कांदा ३० ते ४० रुपये किलोच्या खाली नाही. हिरवा भाजीपाला ग्राहकांना ४० ते ६० रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहे.
- विनोद इंगोले, ग्राहक, परतवाडा