एका व्यक्तीने दाखल केले तब्बल ९ हजार अपील ! नाशिक खंडपीठाने अर्जदाराला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:57 IST2026-01-24T12:50:00+5:302026-01-24T12:57:33+5:30
Amravati : पारदर्शक प्रशासनासाठी निर्माण केलेल्या माहिती अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बीड येथील एका व्यक्तीने तब्बल ९ हजार अपील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक खंडपीठाकडे दाखल केले.

One person filed as many as 9 thousand appeals! Nashik bench heard the applicant
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पारदर्शक प्रशासनासाठी निर्माण केलेल्या माहिती अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बीड येथील एका व्यक्तीने तब्बल ९ हजार अपील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक खंडपीठाकडे दाखल केले. मात्र हे अपील फेटाळत खंडपीठाने अर्जदाराला चांगलेच धारेवर धरले आहे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून अनेकांना 'ब्लॅकमेलिंग' करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर येत आहेत.
माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा हा शासकीय कार्यालयातील सार्वजनिक माहिती मागण्याचा हक्क प्रदान करते. लोकहिताची माहिती मिळविण्याचा अधिकार या कायद्यामुळे सामान्याला मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये या अधिकाराचा 'ब्लॅकमेलिंग'साठी उपयोग केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोघम स्वरूपाची माहिती मागण्यासाठी घरी बसून अर्ज सादर करणाऱ्या एका महाभागाला माहिती आयुक्त नाशिक यांनी चांगलेच खडसावले आहे. माहिती अधिकारात अर्ज सादर करून अपील प्रकरणास गैरहजर राहणारा हा इसम बीड येथील रहिवासी आहे.
तब्बल २६७ अर्जावर सुनावणी
बीड येथील केशव साहेबराव निंबाळकर यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकारांतर्गत अर्ज सादर केले होते. माहिती अधिकार कायद्यानुसार प्रथम अपिलास हजर न राहत थेट द्वितीय अपील सादर केले. २४ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक येथील माहिती आयुक्तांनी निंबाळकर यांच्या २६७ अर्जावर सुनावणी घेत प्रकरण फेटाळले. यावेळी खंडपीठाने अपिलार्थी सुनावणीला हजर राहत नाही. सर्व अर्जावर एकाच तारखेची पोस्ट रजिस्टर पावती जोडतात. थेट द्वितीय अपील करतात. अर्जात कुठलेही जनहित दिसून येत नाही. असे ताशेरे ओढत अपील खारीज केले.
माहिती अधिकाराचा सर्रास दुरुपयोग
माहिती अधिकार अधिनियम २००५ चा सर्रास दुरुपयोग करणाऱ्या केशव निंबाळकर यांची राज्य माहिती आयुक्तांनी कलम ४ (ग) नुसार सूचना फलकावर यादी प्रसिद्ध केली. यामध्ये पुणे खंडपीठाकडे सन २०२४-२५ मध्ये ३३४२ अपील केले. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे ५४६६ आणि नाशिक खंडपीठाकडे १०२३ असे द्वितीय अपील आणि तक्रार अर्ज अपील आयोगाने फेटाळले आहे. माहिती अधिकाराचा किती अमर्यादपणे या व्यक्तीकडून वापर केला गेला, हे सिद्ध होते. परिणामी आयोग आणि शासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरल्या गेले.
आता मोर्चा विदर्भाकडे
केशव निंबाळकर यांचे अपील पुणे, नाशिक, संभाजीनगर खंडपीठाने फेटाळल्यानंतर आता त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज नागपूर, अमरावती विभागात दाखल केलेले आहे. केवळ शासकीय कार्यालयास वेठीस धरणे अशा प्रकाराला वेळीच पायबंद घालणे गरजेचे झाले आहे. माहिती अधिकाराचा वापर जनहितापेक्षा स्वहित जपण्यासाठी अधिक प्रमाणात होत आहे.