नवीन शैक्षणिक धोरण गरीब विद्यार्थ्यांना मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:01 IST2020-12-28T05:00:00+5:302020-12-28T05:01:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शिक्षण हा केंद्र व राज्य या दोहोंच्या अधिकारातील प्रश्न असताना राज्यांना विश्वासात घेण्यात आले ...

नवीन शैक्षणिक धोरण गरीब विद्यार्थ्यांना मारक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिक्षण हा केंद्र व राज्य या दोहोंच्या अधिकारातील प्रश्न असताना राज्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. नवीन शैक्षणिक धोरण हे गरिबांवरील फार मोठे संकट असून, या धोरणाशी राज्याने शंभर टक्के सहमत होऊ नये, असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शिक्षणतर्फे आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन देशमुख बोलत होते. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव मेतकर, प्राचार्य केशवराव गावंडे, माजी न्यायाधीश अशोक ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य प्राचार्य वि.गो. ठाकरे, नरेशचंद्र पाटील, अमोल महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे व रामचंद्र शेळके हे युट्यूब वाहिनीच्या माध्यमाने या कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाचे संचालन मंदा नांदूरकर यांनी केले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे आणि अधीक्षक दिनेश बागल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, सचिव शेषराव खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे आजीव सदस्य अशोक देशमुख, प्रभाकर फुसे, वीर उत्तमराव मोहिते यांच्या कन्या भाग्यरेखा देशमुख, प्राचार्य संयोगिता देशमुख, प्राचार्य शशांक देशमुख, कुमार बोबडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रविवारी सकाळी ८ पासून डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिस्थळी भाऊसाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात आले. शिव परिवाराच्या सदस्यांनी घरूनच भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली.