मोर्शी : शहर व तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहे. तेथे सर्व कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात येत आहेत.
वरूड तालुक्यातील जरूड येथील २८ वर्षीय रुग्ण २४ एप्रिल रोजी येथील कोविड रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांचा सीटी स्कॅन स्कोर २३ होता व शरीरातील ऑक्सिजन लेव्हल ८० होती. त्यांना रेमडेसिविरसहित संपूर्ण औषधोपचार देऊन व योग्य काळजी घेऊन त्यांना ठणठणीत बरे करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड इंचार्ज डॉ. सचिन कोरडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. कुणाल वानखडे, डॉ. ऋषभ अंबुळकर व स्टाफ सुजित वानखडे, अंजुमा, शिवानी हटवार, वैष्णवी जोशी, ज्ञानेश्वर कोरडे यांनी यशस्वी उपचार केले. कोविड हेल्थ सेंटरमधून जाणारा प्रत्येक रुग्ण दुरुस्त होऊन समाधानाने जात आहे.