अल्पवयीन साळीवर भाऊजीची वाईट नजर; लादले गर्भारपण!
By प्रदीप भाकरे | Updated: January 31, 2023 15:27 IST2023-01-31T15:24:42+5:302023-01-31T15:27:28+5:30
जावयाचा प्रताप: पिडितासह बहिणीला जीवे मारण्याची धमकी

अल्पवयीन साळीवर भाऊजीची वाईट नजर; लादले गर्भारपण!
अमरावती : आपल्याकडे कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही. आधी फक्त म्हणीतच तर कधी चेष्टेने ‘साली आधी घरवाली’ म्हटले जात होते. मात्र याच म्हणीचा अर्थ पुर्ण करण्याचा प्रयत्न चांदूरबाजार तालुक्यातील एका मेहुण्याने केला आहे. त्याच्या पराक्रमाची त्या पंचक्रोशीत एकच चर्चा रंगली असून दोन्ही कुटुंबांना मात्र मान खाली घालण्याची वेळ आली आहे. तर या जावयाच्या पराक्रमामुळे सासरचे हैराण झाले आहेत. या मेहुण्याने चक्क अल्पवयीन साळीवर गर्भारपण लादले.
२२ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ या काळात त्या मेहुण्याने अल्पवयीन साळीचे लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी ३० जानेवारी रोजी दुपारी त्यांच्याच हद्दीत राहणाऱ्या ४० वर्षीय अनिल नामक जावयाविरूध्द बलात्कार, पोस्को व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, १७ वर्षीय फिर्यादी मुुलगी ही आरोपीची सख्खी साळी आहे. फिर्यादीची मोठी बहीण अर्थात आरोपीची पत्नी गर्भवती असल्याने घरकाम करण्याकरिता ती तिच्या बहिनीच्या घरी आली होती. दरम्यान, २२ जुलै २०२२ रोजी आरोपीने अल्पवयीन साळीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. घटनेची वाच्यता केल्यास बहिनीला घरातून हाकलून देईल, तुला व तुझ्या बहिणीला मारुन टाकेल अशा प्रकारची धमकी दिली. भीतीपोटी पिडिताने ती बाब कोणालाही सांगितली नाही. यातील आरोपीचे गाव व घटनास्थळ हे चांदूरबाजार तालुक्यात व ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हददीत येते.
असे फुटले बिंग
दरम्यान, २० जानेवारी रोजी पोट दुखत असल्याने पिडिता ही आईसोबत खाजगी दवाखान्यात गेली. त्यावेळी तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निदान करण्यात आले. याप्रकरणी दुसऱ्याच दिवशी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी जावयाविरूध्द त्यावेळी गुन्हा दाखल केला. तो ३० जानेवारी रोजी घटनास्थळ ज्या पोलिसांच्या हद्दीत येते, त्या ब्राम्हणवाडा थडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास आरंभला आहे.