वरूड : तालुक्यात रविवारी सायंकाळी अचानक वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने काचुर्णा, काटी, मांगरुळी पेठसह परिसरात लाखो रुपयांचे नुकसान झाले. विद्युत खांब वाकले, संत्राझाडे उन्मळून पडली, तर घराचे छत, टीन उडाल्याने सर्वत्र हाहाकार माजला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आंबिया बहराची संत्राफळे गळून पडली.
वरूड तालुक्यात रविवारी अचानक ढगाळ वातावरण होऊन वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने चार-पाच गावे अंधारात आहेत. वीज वितरण कंपनीचे दुरुस्तीचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. यात नागरिकांसह शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रतिभा चौधरीसह तलाठ्यांनी घटनास्थळ पाहणी करून पंचनामे सुरु केले आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनीसुद्धा नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली. पंचनामे तयार करून जिल्हा प्रशासनाला पाठविण्याचे निर्देश महसूल अधिकाऱ्यांना दिले. कृषिमंत्र्यांसोबत चर्चा करून मदतीचे आश्वासन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळू पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, राजाभाऊ कुकडे आदी शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे.