खासदार आदर्श ग्राम कळमखार घाणीने बरबटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:06 IST2018-03-03T22:06:16+5:302018-03-03T22:06:16+5:30
खासदार अडसूळ यांनी दत्तक घेतलेले आदर्श ग्राम कळमखार दैनावस्थेला पोहोचले आहे. या गावात प्रवेश करताना मुख्य मार्गावरील कचऱ्याचे ढीग आपले स्वागत करताना दिसून येते.

खासदार आदर्श ग्राम कळमखार घाणीने बरबटले
आॅनलाईन लोकमत
धारणी : खासदार अडसूळ यांनी दत्तक घेतलेले आदर्श ग्राम कळमखार दैनावस्थेला पोहोचले आहे. या गावात प्रवेश करताना मुख्य मार्गावरील कचऱ्याचे ढीग आपले स्वागत करताना दिसून येते.
कळमखार हे धारणी मुख्यालयापासून अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर अवघे ७ कि.मी. अंतरावर आहे. तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव असल्यामुळे ग्रामविस्तार अधिकारी (व्हीडीओ) ग्रामपंचायतला दिले आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी हे गाव चार वर्षांपूर्वी आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले आहे. गेल्या चार वर्षांत या गावात उल्लेखनीय असे कोणतेही काम झालेले नाही. लोकांना गावात मोठी सुविधा देण्यात येणार असल्याचा गवगवा करण्यात आला होता. प्रत्यक्षात त्या प्रस्तावित योजनांची अंमलबजावणी झाले नसल्याचे चित्र आहे. महिन्यातून एकदा गाव पंचायतीत खासदारांच्या उपस्थितीत बैठकी होतात. पण, समस्यांवर तोडगा शोधला जात नाही.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पश्चिमेला लागूनच कचऱ्याचा ढीग आहे, तर उत्तरेला रस्त्यालगत नाली कचऱ्याने तुडूंब भरले असल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा परिणाम दवाखान्यात दाखल रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे.
घरकुलातून भ्रष्टाचार
गावात घरकुल योजनेची अर्धवट कामे भ्रष्ट कारभाराचे कथन करीत आहे. हप्ता मिळत नसल्याने अनेक लाभार्थींचे घरकुल अर्धवट अवस्थेत आहे. याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, धनादेशाकरिता पैशांची मागणी करण्यात होत असल्याची माहिती मिळाली.
एटीएम झाले कॅशलेस
सेंट्रल बँकेचे एटीएम केंद्र गावात मुख्य मार्गावर आहे. कॅशलेस व्यवहार करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न हे एटीएम पूर्ण करीत आहे. या एटीएममध्ये नेहमीच ‘कॅश उपलब्ध नाही’ असा फलक आढळून येतो.