चाकूच्या धाकावर विवाहितेचे अपहरण, दुसऱ्या दिवशी बळजबरी; तिघांविरुद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Updated: November 18, 2022 17:15 IST2022-11-18T17:13:35+5:302022-11-18T17:15:57+5:30
मोर्शी तालुक्यातील घटना

चाकूच्या धाकावर विवाहितेचे अपहरण, दुसऱ्या दिवशी बळजबरी; तिघांविरुद्ध गुन्हा
अमरावती : गळ्याला चाकू लावून एका विवाहितेचे अपहरण करत दुसऱ्या दिवशी तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान मोर्शी तालुक्यातील लिहिदा गावानजिक ही घटना घडली. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी नितीन शंकर नांदणी (३०, लाडकी, ता. मोर्शी) व अन्य एका अनोळखी इसमांविरुद्ध १७ नोव्हेंबर रोजी बलात्कार, अपहरण व ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
१० नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास २६ वर्षीय विवाहिता तिच्या आईच्या घरात असताना आरोपी नितीन नांदणी हा तिच्या घरात शिरला. विवाहितेच्या गळ्याला चाकू लावून एका अनोळखी व्यक्तीला सोबत घेऊन नितीनने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. तिला दुचाकीवर बसवून तो हिवरखेड येथे त्याच्या आत्याच्या घरी पोहोचला. मात्र, आरोपीच्या आत्याने तिला जेथून आणले, तेथे सहिसलामत सोडून दे, असा सल्ला नितीनला दिला.
मात्र, तिला घरी न सोडता तो तिला एसटीने बसने लिहिदा गावातील दुसऱ्या आत्याकडे घेऊन गेला. त्या आत्याने देखील तिला सुखरूप सोडून देण्याचाच सल्ला दिला. मात्र, रात्र झाल्याने त्या दोघांनी तेथेच मुक्काम केले. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी तिला घेऊन आत्याच्या घरून बाहेर पडला. काहीवेळानंतर जंगलातील शिवारातील झोपडी गाठून त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.