महिलादिनीच पत्नीची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयातून भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 17:11 IST2022-03-09T16:46:12+5:302022-03-09T17:11:38+5:30
८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीट भट्टी गाठून धारदार शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले.

महिलादिनीच पत्नीची निर्घृण हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयातून भोसकले
धामणगाव रेल्वे (अमरावती) : अनैतिक संबंधाच्या कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील जुना धामणगाव परिसरातील वीटभट्टीवर मंगळवारी दुपारी घडली. सविता दिनेश खडसे असे मृताचे नाव आहे. तर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील अंजनसिंगी वार्ड नंबर ४ येथील हात मजुरी करणाऱ्या दिनेश सुधाकर खेडकर याचे आठ वर्षांपूर्वी वडरपुरा अमरावती येथील सविता या युवतीशी लग्न झाले. दोन वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने दिनेश पत्नीसह वडरपुरा अमरावती येथे सासरवाडीला राहू लागला. दरम्यान जानेवारी महिन्यात सविता आपल्या एका लहान मुलाला सोबत घेऊन कोणाला काहीही न सांगता तेथून निघून गेली होती. नातेवाईकांकडे व सर्वत्र शोधाशोध केली असता तब्बल दोन महिन्यानंतर सविता जुना धामणगाव येथील एका व्यक्तीच्या घरी राहत असल्याची माहिती दिनेशला मिळाली. त्याने अंजनसिंगी येथील आपल्या आईवडिलांना सांगून सविताच्या अशोकनगर येथील एका नातेवाईकास घेऊन तिची समजूत काढली. मात्र सविताने घरी परतण्यास नकार दिला.
जुना धामणगाव येथील संबंधित व्यक्तीने सुद्धा कुटुंबात वाद नको, म्हणून सविताला जवळच्याच दाभाडे रस्त्यावरील गजानन गोठाणे यांच्या वीटभट्टीवर नेऊन ठेवले. ही माहिती दिनेशला कळताच त्याने ८ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास वीट भट्टी गाठून धारदार शस्त्राने सवितावर सपासप वार करून तिला जागीच ठार केले. दत्तापूरचे ठाणेदार राजेश राठोड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान दत्तापूर पोलिसांनी दिनेश खेडकर (३५) याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी, विजय सिंग बघेल, सचिन गायधने, सागर कदम, अमोल सानप, सुधीर बावणे, संदीप वासनिक करीत आहेत.