मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधताय? सावधान ! मी 'यूएस'ला डॉक्टर आहे सांगून महिलेला २.३५ लाखांना लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:07 IST2025-11-07T18:05:27+5:302025-11-07T18:07:14+5:30
२.३५ लाखांना लुबाडले : महिलेची गाडगेनगर पोलिसांत धाव, न्युयार्कच्या तोतयाविरूद्ध गुन्हा

Looking for a partner on a matrimony site? Beware! Saying I live in 'US' I am a doctor, man duped a woman of Rs 2.35 lakhs
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोशल नेटवर्किंगसह आता मॅट्रिमोनी वेबसाईटवरही सायबर भामट्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच मॅट्रिमोनी साईटवरील ओळख येथील एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. एकाने आपण यूएसमध्ये डॉक्टर असून सध्या सीरियामध्ये असल्याची बतावणी केली. विश्वास निर्माण केला आणि त्यानंतर तिच्याकडून २ लाख ३५ हजार १३३ रुपये उकळले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी एका तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. डॉ. सुनीत भुमर (३४, रा. न्यूयॉर्क, यूएसए) असे त्या तोतयाचे नाव आहे.
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेने काही दिवसांपूर्वी एका मॅटिमोनी अॅपवर प्रोफाइल तयार केले. त्यानंतर तिला एका ३४ वर्षीय तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात डॉक्टर असल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेला समोरील व्यक्तीने स्वतःचे नाव डॉ. सुनीत असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात सोशल मीडिया अकाउंटवरून चॅटिंग सुरू झाले होते. आपण यूएसएमध्ये डॉक्टर आहे, सध्या कंत्राटी पद्धतीने सीरिया या देशात काम करतो आहे. २७ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्यात नियमितपणे चॅटिंग सुरू होते. त्या कालावधीत त्यांचा संवाद वाढला.
तो झाला 'नॉट रिचेबल'
आरोपीने सीरियामधून बाहेर निघताना कागदपत्रांसाठी आवश्यक १ लाख ३३ हजार १७८ रुपये मागितले, ती रक्कम तिने त्याला ट्रान्सफर केली. त्यानंतर काही रोख मला दाखवावी लागेल, असे सांगून त्याने महिलेकडे ५७ हजार ७८३ रुपये मागितले. महिलेने ती रक्कमसुद्धा त्याच्या खात्यात ट्रान्सफर केली. नंतर मात्र त्याच्यासोबत संपर्कच झाला नाही.
मी भारतात येतोय, माझ्या खात्यात ३८ कोटी रुपये
आपण भारतामध्ये येत आहोत. आपल्या भारतातील एका बँकेतील खात्यामध्ये ३८ कोटी रुपये आहे. त्यामुळे तू त्या खात्यामधून मला पाच लाख रुपये ट्रान्सफर करून दे, अशी बतावणी आरोपीने केली. त्यामुळे महिलेने त्याच्याच खात्यामधून त्याला पाच लाख रुपये ट्रान्सफर केले. त्या व्यवहारामुळे तिचा आरोपीवर विश्वास बसला.