हायब्रीड अ‍ॅन्युईटीच्या कामांना निधीअभावी ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:01:18+5:30

काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्णत्वास गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये साडेतीन महिने कामे बंद होती. उन्हाळ्यात जी कामे व्हायला हवी होती ती झाली नाही. मार्गावरील अनेक पुलांचे कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यात पावसाचे पाणी साचले आहे.

Lack of funding for hybrid annuity works | हायब्रीड अ‍ॅन्युईटीच्या कामांना निधीअभावी ब्रेक

हायब्रीड अ‍ॅन्युईटीच्या कामांना निधीअभावी ब्रेक

Next
ठळक मुद्दे१४७ किमीची कामे अद्यापही प्रलंबित : लॉकडाऊनमुळे कामांना विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : '६० टक्के निधी शासनाचा ४० टक्के गुंतवणूक कंत्राटदारांची' या तत्त्वावर जिल्ह्यात हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत १० विविध मार्गांची कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये ४१२ पैकी २६५ किमीची कामे पूर्णत्वास गेली असून, अद्यापही १४७ किमीची रस्त्याची कामे प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर कामांना निधीअभावी कंत्राटदाराने ब्रेक लावला असल्याचे बोलल्या जात आहे.
१४७ किमीच्या कामांमध्ये आसरा- दर्यापूर, वलगाव दर्यापूर, परतवाडा-घटांग व इतर काही रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सदर १० मार्गाच्या विकासकामांची १४६० कोटींची निविदा असून, सदर काम हे मुंबई येथील एका कंपनीला मिळाले आहे. सुरुवातीला काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्णत्वास गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये साडेतीन महिने कामे बंद होती. उन्हाळ्यात जी कामे व्हायला हवी होती ती झाली नाही. मार्गावरील अनेक पुलांचे कामे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यात पावसाचे पाणी साचले आहे. आसरा-दर्यापूर, खोलापूर दर्यापूर मार्गावर गिट्टी टाकल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वेलकम पॉईंट ते बियाणीपर्यंतच्या मार्गाचे कामे करण्यात येत आहे.
दर्यापूर-अंजनगाव, दर्यापूर- मूर्तिजापूर, दर्यापूर-म्हैसांग अकोला, वलगांव- खोलापूर तसेच अमरावती- चांदूररेल्वे धामणगाव व इतर मार्गाचे कामे पूर्णत्वास गेले आहे तर काही ठिकाणी काही किमीची कामे प्रलंबित आहेत. मार्डी-कुºहा-कौंडण्यपूर मार्गाचे काम झाले आहे. तसेच उर्वरित रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत.
२३० कोटींची नव्याने मागणी
हायब्रीड अ‍ॅन्युईटीची कामे करण्याकरिता आतापर्यंत ५०० कोटींचा निधी प्राप्त झाला असून, सदर कामांवर खर्च झाला आहे. नव्याने २३० कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घटांग मार्गाला वनविभागाचा खोडा
परतवाडा-चिखलदार-घटांग मार्ग हा काही किमीपर्यंत वनविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या मार्गावर विकासात्मक कामे सुरू करण्यातस बांधकाम विभागाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. वनविभागाच्या क्षेत्रातून रस्त्याची कामे परवानगीकरिता बांधकाम विभागाने वनविभागाशी पत्रव्यवहार केला आहे. पण अद्यापही यश आले नाही. जे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित येत नाही, त्या भागात रस्त्यांची कामे करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खोदकाम करून अर्धवट ठेवली कामे
खोलापूर ते दर्यापूर दरम्यान रस्त्याचे काही किमीचे कामे करण्याकरिता रस्त्याच्या कडेला खोदकाम केले आहे. तसेच दर्यापूर शहरातही अमरावती मार्गावर खोदकाम करून कामे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाऊनमुळे कामे बंद होती. मात्र, आता कामे सुरू झाली आहेत. शासनाकडे नव्याने २३० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. २६५ किमीची कामे पूर्ण झालेली आहेत.
- अरुधंती शर्मा
अधीक्षक अभियंता अमरावती

Web Title: Lack of funding for hybrid annuity works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.