झाडा येथील शेतकरीपुत्र 'इस्रो'त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:01:58+5:30

वैभवने २०१८ साली धामणगावच्या शासकीय आयटीआयमधून ‘आयसीटीएसएम’ (इन्फर्मेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - सिस्टीम मेंटेनन्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात त्याने अप्रेंटिस कालावधी पूर्ण केला. त्या कालावधीत इस्रो आणि डीआरडीओ अशा संरक्षण-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, याबाबत त्याने प्रयत्न सुरू केले.

In 'ISRO', the son of a farmer from Zada | झाडा येथील शेतकरीपुत्र 'इस्रो'त

झाडा येथील शेतकरीपुत्र 'इस्रो'त

googlenewsNext
ठळक मुद्देतंत्रज्ञ म्हणून निवड । धामणगाव आयटीआयच्या विद्यार्थ्याची झेप

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : आदर्श ग्राम झाडा येथील एका शेतकरीपुत्राची बंगळुरु स्थित भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्रो) मध्ये निवड झाली आहे. तो धामणगाव रेल्वे येथील आयटीआयचा माजी विद्यार्थी आहे. त्याच्या निवडीने विद्यानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. वैभव दिलीप खैरकार असे या शेतकरीपुत्राचे नाव आहे.
ग्रामस्वच्छता अभियानासाठी ३०० हून अधिक पारितोषिक पटकावणाऱ्या झाडा या गावातील शेतकरी दिलीप खैरकार यांना दोन मुले. मोठा मुलगा सैन्यात कामगिरी बजावत आहे. वैभव हा धाकटा. शेतीत राबायचे, पण मुलांना शिकून मोठे करायचे, अशी जिद्द बाळगून त्यांनी मुलांना घडविले.
वैभवने २०१८ साली धामणगावच्या शासकीय आयटीआयमधून ‘आयसीटीएसएम’ (इन्फर्मेशन अ‍ॅन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी - सिस्टीम मेंटेनन्स) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला. मुंबई दूरदर्शन केंद्रात त्याने अप्रेंटिस कालावधी पूर्ण केला. त्या कालावधीत इस्रो आणि डीआरडीओ अशा संरक्षण-माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, याबाबत त्याने प्रयत्न सुरू केले.
डॉ. वसंत गोवारीकर यांनी ज्या संस्थेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली, त्या इस्रोमध्ये निवड होण्यासाठी अनेक जण तयारी करीत असतात. त्यामुळे वैभवने परीक्षा, अर्ज भरणे सुरू केले. निवडीची प्रक्रिया व कामाच्या स्वरूपाबाबत सखोल अध्ययन केले. अखेर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत येथे टेक्निशियन या पदाकरिता देशातील केवळ तीन उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यापैकी झाडा येथील वैभव खैरकार हा एक ठरला आहे. याबद्दल धामणगाव येथील आयटीआयचे प्राचार्य राजेश शेळके यांनी वैभवचा सत्कार केला.

जिद्द, चिकाटी व मेहनतीने यश मिळू शकते. माझे जन्मदाते व आयटीआयचे प्राचार्य, प्राध्यापकांचा माझ्या यशात सर्वात मोठा वाटा आहे.
- वैभव खैरकार

Web Title: In 'ISRO', the son of a farmer from Zada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो