पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:27 IST2025-05-05T15:25:46+5:302025-05-05T15:27:26+5:30
Amravati : परीक्षेच्या एक दिवस आधी मुंबईला परीक्षेसाठी हजर राहण्याच्या सूचना

Injustice against students from Vidarbha in CET exam of PCM group
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटाच्या परीक्षेमध्ये तांत्रिक बिघाडानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे; परंतु राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एकदिवस आधी म्हणजेच ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता विदर्भातील बहुतांश विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर मुंबई येथील परीक्षा केंद्र असून सकाळी ७वाजता हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्याच अनुषंगाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पीसीएम ग्रुपची एमचटी सीईटी परीक्षा ही १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान एकूण १५ सत्रामध्ये घेण्यात आली होती. राज्यभरातील १९७ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली; परंतु २७ एप्रिल रोजी या परीक्षेत काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे २७एप्रिल रोजी झालेली परीक्षा रद्द करून ती ५ मे रोजी होणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते; परंतु यामध्ये विदर्भातील बहुतांश विद्यार्थ्यांना मुंबई येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रासंदर्भातील माहितीदेखील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एकदिवस आधी म्हणजेच ४ मे रोजी व्हॉट्सअॅप मॅसेजवर देण्यात आली आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळेत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर कसे पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विदर्भातील मुलांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप आता विद्यार्थी व पालक करत आहे.