Infected soybeans should receive government assistance, insurance coverage | बाधित सोयाबीनला शासन मदत, विमा भरपाई मिळावी

बाधित सोयाबीनला शासन मदत, विमा भरपाई मिळावी

ठळक मुद्देनितीन धांडेची मागणी : आरडीसींना निवेदन, हजारो हेक्टरमध्ये नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सततच्या पावसामुळे धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. फवारणीचा फारसा उपयोग झालेला नाही. सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा व आजूबाजूच्या परिसरातील सोयाबीन पिकाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. सुरुवातीच्या काळात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ झालेली नाही. आॅगस्ट अखेरपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही. या प्रतिकूल वातावरणामुळे फवारणीपश्चातही सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.
सद्यस्थितीत सोयाबीन पिकाला अत्यल्प शेंगा आहेत. सरासरी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे या पिकांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नितीन धांडे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रशांत वैद्य, अविनाश ब्राम्हणवाडे, मंगेश तुपट, अमोल सोनटक्के, सुरेश खटाळे, विठ्ठल सुरोशे, विठ्ठलराव पवार, पुंजाराम पाचमोहोर, प्रमोद सोनटक्के, तुकाराम सोनटक्के, भीमराव राऊत, संदीप सुरोशे, माणिकराव चोपडे, शालिग्राम तुपट, प्रकाश तुपट, सुभाष तुपट, सुभाष ठाकरे, बाबाराव सोनटक्के, दादाराव पवार, किशोर मोरे, रितेश कोल्हे यांच्यासह धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्या
शासनाने शेतकºयांचे कर्जमाफ केले असले तरी महसूल विभाग व बँका यांच्यातील समन्वयाअभावी बहुतांश कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यांनाही तातडीने लाभ मिळावा. हरभºयाचे प्रलंबित अनुदान मिळावे आदी मागण्या नितीन धांडे यांनी निवेदनातून मांडल्या. निवासी उपजिल्हाधिकाºयांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित विभागाला याविषयी तातडीने कळवून सर्वेक्षणाच्या सूचना दिल्यात.

Web Title: Infected soybeans should receive government assistance, insurance coverage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.