‘लिव्ह इन’मध्ये बळजबरी; ‘ती’वर लादले मातृत्व, गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Updated: February 23, 2023 18:02 IST2023-02-23T18:01:36+5:302023-02-23T18:02:22+5:30
पीडिता अल्पवयीन: आरोपी मध्यप्रदेशातील, घटना बडनेरा हद्दीतील

‘लिव्ह इन’मध्ये बळजबरी; ‘ती’वर लादले मातृत्व, गुन्हा दाखल
अमरावती : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लिव्ह इन’ मध्ये राहिलेल्या तरूणाने तिच्यावर मातृत्व लादले. २० फेब्रुवारी रोजी त्या अल्पवयीन मुलीने एका रूग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यानंतर बलात्काराची ती घटना उघड झाली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपी परशुराम कचरू कासदेकर (२२, रा. कावला, जि. बैतुल, मध्यप्रदेश) याच्याविरूद्ध बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
आरोपी व पीडित मुलगी हे परस्परांचे ओळखीचे आहेत. तक्रारीनुसार, आरोपीने पिडिताशी जवळीक निर्माण केली. मला तू खुप आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, अशी बतावणी त्याने केली. काही दिवसांनी तो तिला एका गावात घेऊन गेला. गावातील दुर्गा मंदिरामध्ये नेऊन तिच्या गळ्यात हार टाकला. तिच्या भांगेत कुंकू भरले. नोव्हेंबर २०२२ पासून त्याने त्या अल्पवयीन मुलीला पत्नी म्हणून घरी ठेवले. त्यादरम्यान, त्याने तिच्यावर शारिरिक अत्याचार केला. त्यानंतर दोघेही बडनेरा हददीतील आपआपल्या कामावर परतले.
असे फुटले बिंग
दरम्यान, प्रसवकळा सुरू झाल्याने आरोपीनेच तिला एका रूग्णालयात दाखल केले. तेथे २१ फेब्रुवारी रोजी रात्री एकच्या सुमारास तिची प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला. तपासणीवेळी ती गर्भवती असलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याबाबत बडनेरा पोलिसांसह बाल कल्याण समितीला कळविण्यात आले. बडनेरा ठाण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यांनी बालकल्याण समितीसमक्ष तिचे बयाण नोंदविले. त्यानंतर आरोपीचे नाव समोर आले.
पीडित प्रसुताच्या बयाणावरून संबंधित आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.
- बाबाराव अवचार, ठाणेदार, बडनेरा