'मला माझा हरविलेला मोबाइल पाहिजे' म्हणत शूटरने मित्रावर शंका घेत केले जीवघेणे वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:41 IST2025-11-13T19:36:35+5:302025-11-13T19:41:20+5:30
Amravati : नांदगाव पेठ पोलिसांकडून आरोपींना दोन तासांत अटक

'I want my lost mobile', shooter fatally stabs friend after suspecting him
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मला माझा हरविलेला मोबाइल पाहिजे, असे म्हणून शूटर असे टोपणनाव असलेल्या आरोपीने आपल्या सहकाऱ्यासमवेत आपल्याच मित्रावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. बुधवारी स्थानिक न्यायालयाने त्या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
१० नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास रहाटगाव परिसरातील संबोधी कॉलनी येथे ती घटना घडली. अनिकेत सुनित खांडेकर (वय १९, रा. संबोधी कॉलनी) असे गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, नांदगाव पेठ पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३७वाजता आरोपी प्रशिक वासनिक ऊर्फ शूटर (२७) व संकेत खरबडे (२५, दोन्ही रा. रहाटगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तथा ठाणेदार दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना लागलीच अटक केली.
अशी घडली घटना
रात्री ८ च्या सुमारास अनिकेत हा घरी असताना दोन्ही आरोपी त्याच्या घराजवळ आले. अनिकेत घराबाहेर आला असता तू रोहितला फोन कर, तुम्ही सोबत असताना माझा फोन हरविला, असे प्रशिकने सुनावले. संकेतने त्याची कॉलर पकडली, तर प्रशिकने अनिकेतच्या छातीवर दोन ठिकाणी व कमरेवर डाव्या बाजूस चाकूने वार केले.
"आरोपी हार्डकोअर क्रिमिनल आहेत. त्यांच्याविरोधात बॉडी ऑफेन्सेस व अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली."
- दिनेश दहातोंडे, ठाणेदार, नांदगाव पेठ