भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2022 17:17 IST2022-07-27T16:26:37+5:302022-07-27T17:17:09+5:30
अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला.

भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला
अमरावती : एरवी चोरी, घरफोडी केल्यानंतर चोर तातडीने रफुचक्कर होतात. आपण पकडले जाऊ नये, अशी भीती त्यामागे असते. मात्र एक चोर भलताच प्रामाणिक निघाला. त्याने खिडकीत ठेवलेल्या चावीने दाराचे कुलूप उघडून घरातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. २५ जुलै रोजी सकाळी ११.३० ते ५.३० च्या कालावधीत हा प्रकार घडला.
गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला घराला कुलूप लावून बाहेर पडली. मात्र, आपल्या अनुपस्थितीत कुटुंबातील अन्य सदस्य घरी परतणार असल्याने तिने कुलपाची चावी घराच्या खिडकीत सहजासहजी दिसणार नाही, या पद्धतीने ठेवली.
ती घराबाहेर पडताच सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एक चोर त्या महिलेच्या घरात शिरला. त्याने खिडकीत ठेवलेली चावी शोधली. घरात प्रवेश करून केवळ मोबाईल चोरला. अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले. चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ती महिला सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरी परतली असता, चोरीचा हा अफलातून प्रकार उघड झाला. याप्रकरणी २५ जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.