बच्चू कडू यांच्या अपात्रतेला हायकोर्टाने दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:28 IST2025-06-25T12:27:22+5:302025-06-25T12:28:25+5:30

८ जुलैला अंतिम सुनावणी : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत अंतरिम दिलासा

High Court stays disqualification of Bachchu Kadu | बच्चू कडू यांच्या अपात्रतेला हायकोर्टाने दिली स्थगिती

High Court stays disqualification of Bachchu Kadu

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाकरिता अपात्र ठरवणाऱ्या वादग्रस्त आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, या प्रकरणावर येत्या ८ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली.


कडू यांनी २०१७ मध्ये नाशिक येथे सामाजिक प्रश्नांकरिता आंदोलन केले होते. त्यामुळे सुकरवाडा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे इत्यादी गुन्हे दाखल केले होते. त्या गुन्ह्यात २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने कडू यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे संस्थांच्या विभागीय सहकारी सहनिबंधकांनी गेल्या १६ जून रोजी वादग्रस्त आदेश जारी करून कडू यांना पाच वर्षांकरिता अपात्र ठरविले. त्याविरुद्ध कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा आदेश अवैध आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कडू यांच्यातर्फे अॅड. रवींद्र खापरे व अॅड. पराग कडू तर, तक्रारकर्त्यांतर्फे अॅड. हरीश डांगरे व अॅड. ऋग्वेद ढोरे यांनी कामकाज पाहिले. 


तक्रारीमुळे कारवाई
हरिभाऊ मोहोड व इतर ११ संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल करून कडू यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. एक वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यामुळे सहकार कायद्यानुसार ते अध्यक्षपदी कायम राहू शकत नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला होता. ती तक्रार मंजूर करून कडू यांना अपात्र ठरविण्यात आले.

Web Title: High Court stays disqualification of Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.