मेळघाटच्या आरोग्य यंत्रणेवर आरोग्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:36 IST2025-12-12T15:35:21+5:302025-12-12T15:36:10+5:30
आदिवासी मध्य प्रदेशातील बंगाली डॉक्टरच्या दारी : हतरूमध्ये डॉक्टर, कर्मचारी बेपत्ता : सात वर्षांपासून एकताई उपकेंद्राला टाळे

Health Minister expresses strong displeasure over Melghat's health system
लोकमत न्यूज नेटवर्क
मेळघाट (अमरावती): मेळघाटातआरोग्यव्यवस्थेतील अनागोंदीने आदिवासी हैराण आहेत. त्यात 'लोकमत'च्या वृत्तमालिकेने प्रशासनात खळबळ उडाली. गुरुवारी आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटचे आमदार व यंत्रणेसोबत नागपूर येथे बैठक घेत समस्या जाणून घेतल्या. दुसरीकडे याच बैठकीत अतिदुर्गम हतरू आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी बेपत्ता आणि एकताई उपकेंद्राला मागील सात वर्षापासून टाळे लागले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. परिणामी, आदिवासी मध्य प्रदेशातील खेड्यांमधून उपचार देणाऱ्या कथित बंगाली डॉक्टरांच्या दारी जाऊन उपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी नागपूर येथील आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयात मेळघाटचे आमदार केवळराम काळेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सिकलसेल, रिक्त जागा, यासह मेळघाटातील आरोग्य सचिवांचा दौऱ्यातून पुढे आलेल्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. मेळघाटात आरोग्य यंत्रणा अजूनही कुचकामी ठरली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी करतात तरी काय, त्यांच्यावर सर्वप्रथम कारवाईचा सूर यावेळी लागला.
'लोकमत'चे कात्रण आरोग्यमंत्र्यांना
मेळघाटातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव चित्र 'लोकमत'ने दररोज प्रकाशित केले. आ. काळे यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदनासोबतच सर्व वृत्तांचे कात्रण दिले.
मध्य प्रदेशातील कथित डॉक्टरांकडे धाव
एकताई येथे आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत, सुविधा, साधनसामग्री उपलब्ध आहे; पण डॉक्टर व कर्मचारी नसल्याने दवाखाना सात वर्षांपासून बंदच आहे. त्यामुळे ही लाखोंची इमारत जीर्ण होत आहे. यामुळे एकताईसह सुमिता, सलिता, भांडुम, खुटीदा ही गावे लगतच्या मध्य प्रदेशातील मोहटा दामजीपुरा येथील बंगाली डॉक्टरांकडे उपचार घेत असल्याचे चिलाटी येथील मैत्री संस्थेचे रामेश्वर फड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
हतरू केंद्र रामभरोसे
हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स, कंपाउंडर, संगणक परिचालक, कर्मचारी नियमित हजेरी लावत नाहीत. आजारानुसार आवश्यक औषधे नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
आरोग्यमंत्री करणार पुन्हा दौरा
आरोग्यमंत्र्यांनी यापूर्वीच मेळघाटचा दौरा केला होता. मात्र, त्यानंतर कुठलाच बदल आरोग्य यंत्रणेत झाला नाही. गुरुवारी बैठकीत त्यांनी मेळघाट दौऱ्याचे संकेत दिले.