म्हणाला, 'ती' बेवफा सनम; अन् तिच्याच अपार्टमेंटहून त्याने स्वतःला झोकून दिले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:03 IST2025-09-30T20:01:08+5:302025-09-30T20:03:01+5:30
Amravati : पोलिसाने वाचविले प्राणः 'ती'च्यावर बेवफा होण्याचा आरोप, व्हीसीही केली

He said, 'She's unfaithful Sanam; and he threw himself from her apartment!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ती बेवफा सनम निघाली. तिने ब्रेकअप केले. आता तिच्याच समक्ष मला जीवन संपवायचे आहे, असे तो ओरडून पोलिसांना सांगत होता. त्यावेळी त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला त्याने व्हिडिओ कॉलदेखील केला. तर पोलिस 'तू आधी खाली ये, आपण सर्व काही नीट करू', असा शब्द देत होते. सिव्हिल ड्रेसवरील एक पोलिस कर्मचारी त्याच्याशी संवाद साधत असतानाच त्याने स्वतःला सहा मजली अपार्टमेंटच्या बाल्कनीतून स्वतःला खाली झोकून दिले. मात्र पोलिसाने समयसूचकता दाखवत त्याचे प्राण वाचविले. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील पुंडलिकबाबा नगरातील एका अपार्टमेंटमध्ये हा थरार घडला.
वेदांत (२४) असे तरुणाचे नाव आहे. मोर्शी तालुक्यातील रहिवासी वेदांत हा येथे राहून शिक्षण घेतो. दोन वर्षापूर्वी त्याचे एका तरुणीशीत प्रेमसंबंध निर्माण झाले. अलिकडे तरुणीने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. तिच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी सोमवारीच त्याच्याविरुद्ध एनसी नोंदविली होती.
दोन तास थरार
गाडगेनगरचे ठाणेदार अतुल वर यांनी वेदांतची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. आपण तिला अनेकदा आर्थिक मदत केली. ती आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्याने केला. जवळपास दोन तास त्यात गेले. पोलिसांनी त्याला झेलता यावे, यासाठी खाली जाळी लावली होती.
असे वाचविले प्राण
शहर बीडीडीएसमध्ये कार्यरत अंमलदार कमलेश शिंदे हे त्याच परिसरात राहतात. ते मागील बाजूने त्या टेरेसवर चढले. त्याने स्वतःला खाली झोकून दिले तेव्हा शिंदे यांनी त्याला कमरेच्या बाजूने त्यास पकडले. त्यावेळी तो हवेत झुलत होता. अन्य अंमलदारांनी त्याला पकडले. त्याचे प्राण वाचले.