म्हणाला, ही तर विवाहित; जुळलेली लग्नगाठ मोडली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:01 IST2025-04-08T10:59:09+5:302025-04-08T11:01:48+5:30
तरुणीचे स्वप्नभंग : आरोपी डॉक्टर पोहोचला 'ती'च्या नियोजित वराच्या घरी

He said, "She is married; the marriage bond has been broken!"
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापुरातील एका डॉक्टरने ओळखीतील तरुणीच्या नियोजित वराचे घर गाठून तुम्ही ज्या मुलीशी लग्न करणार आहात, ती आधीच विवाहित असल्याचे सांगितल्याने त्या तरुणीचे लग्न मोडले. ही धक्कादायक घटना दर्यापुरात उघड झाली. या प्रकरणी २७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी ६ एप्रिल रोजी आरोपी. जयदीप पावडे (वय ३०, रा. दर्यापूर) याच्याविरुद्ध विनयभंग व बदनामीचा गुन्हा दाखल केला.
एफआयआरनुसार, आरोपीचे बनोसा भागात हॉस्पिटल आहे. फिर्यादी २७ वर्षीय तरुणीच्या आजीचा तेथे उपचार सुरू होता. त्यामुळे ती आजीला घेऊन नेहमीच डॉ. पावडे याच्याकडे जायची. त्यामुळे आरोपी व तरुणीत ओळख झाली. आरोपी हा तरुणीला फोनही करत होता. दरम्यान, २४ मार्च २०२५ रोजी एका तरुणाशी तिचा साखरपुडा झाला. मे महिन्यात लग्नाची तारीख निघाली. लग्न निश्चित झाले. त्यानंतरही आरोपीने तिचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला.
अखेर खूप विचारविमर्श करून पीडित तरुणीने ६ एप्रिल रोजी दर्यापूर पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिस हवालदार अर्चना इंगळे यांनी त्या तरुणीची तक्रार दाखल करून घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल दांदळे हे करीत आहेत. आरोपीने आपला पाठलाग केला. तथा जुळलेले लग्न तोडून आपली बदनामी केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
बदनामीची धमकी अन् संबंध तुटला
मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू थांबली नाहीस, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझ्याबद्दल खोटी माहिती सांगून तुझी बदनामी करेन, अशी धमकी डॉ. जयदीप पावडे याने तरुणीला दिली. दरम्यान, ३० मार्च रोजी तरुणीच्या नियोजित सासरकडील मंडळी तिच्या दर्यापुरातील घरी आली. आरोपी डॉ. जयदीप हा आपल्या घरी आला होता, असे त्यांनी सांगितले. तुम्ही ज्या मुलीसोबत लग्नसंबंध जोडला आहे, तिचे लग्न झाले असून, त्याने लग्नाचे सर्टिफिकेटही दाखविल्याचे सांगत आम्ही हा संबंध तोडत आहोत, असे सांगून ते निघून गेले. त्यामुळे तरुणीसह तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.