लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एका अल्पवयीन मुलीला पळवून आणत तिच्याशी बालविवाह करण्यात आला. त्यातून पुढे गर्भधारणा होताच तिला घराबाहेर हाकलण्यात आले. यातील पीडिता ही केवळ १४ वर्षे वयाची आहे. पीडितेच्या कथित पतीसह त्याच्या वडिलांनी तो कारनामा केला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शुक्रवारी चिखलदरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी तिच्या संजय नामक कथित पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
चिखलदरा तालुक्यातील त्या मुलीची गतवर्षी नवरात्रीमध्ये संजयशी ओळख झाली होती. यात्रेदरम्यान तिचे अपहरण करून तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला. ती बाब समजताच पीडितेचे आई-वडील संजयच्या घरी गेले. मात्र तेथे दोन कुटुंबीयांमध्ये वादविवाद झाला. मुलगी अल्पवयीन असल्याने आपण तिचे लग्न करू इच्छित नाही, ते कायदेशीरदेखील नाही, असा पवित्रा पीडितेच्या आई-वडिलांनी घेतला. मात्र त्यानंतर संजयच्या आई-वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्या बालविवाहानंतर ते पती-पत्नीसारखे राहू लागले. त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध देखील झाले. नोव्हेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ च्या सुमारास ती अत्याचाराची घटना घडली.
असा घडला घटनाक्रम
दरम्यान, संजयने पीडितेला तपासणीकरिता नेले असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी ती बाब पोलिसांना देखील कळविली. त्याचवेळी पीडितेचा पती, सासू-सासरे व पोलिस पाटलाने पीडितेला आता तू तुझ्या वडिलांच्या घरी निघून जा, असे बजावले. त्यांनी कुठलीही जबाबदारी स्वीकारली नाही. आरोपी संजयच्या वडिलांनी पीडितेला तिच्या माहेरी आणून सोडले. त्यानंतर पीडितेने आई-वडिलांसह अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशन गाठले.