लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशभरातून एकट्या अमरावती शहराची हवा शुद्ध असल्याचे केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. या यशामागे अमरावती महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे; पण 'अंबानगरीची हिरवी ओळख' टिकवून ठेवण्यात ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोलाची कामगिरी बजावली, त्या सर्व यंत्रणा, संघटना, लोकप्रतिनिधी आदी कौतुकास पात्र ठरले आहे.
२०२५'मध्ये 'स्वच्छ वायू सर्वेक्षण शहराने देशभरातील शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत पहिले पारितोषिक पटकावले आहे. हा पुरस्कार मंगळवारी (दि.९) नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आयुक्त सौम्या शर्मा (चांडक) यांनी प्रदान करण्यात आला. अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३ ते १० लाख लोकसंख्या) या गटात स्पर्धेत परिपूर्ण २०० गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले. अमरावतीला ७५ लाखांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराने अमरावती शहराची शान उंचावली. हा पुरस्कार का आणि कशासाठी मिळाला, हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. खरे तर अमरावती शहरात १५ लाख वृक्ष असल्याची नोंद आहे. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती वन विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, रस्ता दुभाजकावर हिरवळ, अमरावती महानगरात ११० गार्डन, शिवटेकडी, वडाळी गार्डन यासह घरगुती वृक्षांचा समावेश करण्यात आला आहे.
स्वच्छ वायू सर्वेक्षणात यावर फोकस
स्वच्छ वायू सर्वेक्षणअंतर्गत प्रामुख्याने शहरातील पक्के रस्ते, रस्त्यांची निर्मिती, ऐन्ड टू ऐन्ड पेव्हमेंट, रोडचे बाजूला आणि दुभाजकावर हरित आच्छादन, वृक्ष लागवड संवर्धन, रस्त्यांची स्वच्छता, बांधकाम, पाडकाम कचरा निर्मिती, संकलन व प्रक्रिया, नागरी घनकचरा व्यवस्थापन, चॉडांची संख्या, दैनंदिन घनकचरा निर्मिती, डोअर टू डोअर घनकचरा संकलन, घनकचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा प्रकल्प क्षमता, लिगसी वेस्ट प्रक्रिया आदी. दरदिवशी ३०० टन धनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व कापड वेगळे करून प्रक्रियेअंती २७ हजार टन साहित्य सिमेंट कंपनीला पुरवठा करण्यात आला.
हवेच्या गुणवत्तेत सुधारणा
वाहन तपासणीकरिता पीयूसी सेंटर, पब्लिक ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, पेट्रोल पंप, एल.पी.जी. कनेक्शन, वायू प्रदूषणाची स्थिती व तक्रार निवारण प्रणाली, २४ तास वीजपुरवठा, जनजागृती, ऑनलाइन मॉनिटरिंग स्टेशन, एअर पोल्युटिंग इंड्रस्ट्रीज आदी.केंद्र सरकारचे वायू प्रदूषण नियंत्रण बोर्ड, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूरचे निरीच्या चमूने अमरावतीची तपासणी करून या स्पर्धेसाठी अहवाल केंद्र सरकारकडे सोपविला.
"शहराला पुरस्कार मिळाला ही गौरवशाली बाब आहे. मात्र, शुद्ध हवेसाठी ही स्थिती कायम ठेवण्यासाठी अमरावतीकरांवर मोठी जबाबदारी आली आहे. त्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे."- सौम्या शर्मा (चांडक), आयुक्त, मनपा