कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी?
By गणेश वासनिक | Updated: October 20, 2023 18:11 IST2023-10-20T18:08:37+5:302023-10-20T18:11:39+5:30
कारागृहात तटालगत बॉलमध्ये आढळला गांजा, नागपुरी खर्रा; फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल

कारागृहात कैद्यांपर्यत गांजा पोहोचवतो कोण? सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी?
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असलेल्या एका जनरल सुभेदाराला गुरूवारी पहाटे ६ वाजता निळ्या रंगाचा चेंडू दिसून आला. यात १९ ग्राम गांजा आणि दोन नागपुरी खर्राच्या पुड्या होत्या. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. मात्र, कारागृहात कैद्यांपर्यंत गांजा पोहोचवतो कोण, सुरक्षा रक्षक की पहारेकरी कैदी? याचा शोध घेणे आता संशोधनाचा विषय आहे. आधल्या दिवशी कारागृहात कैद्याकडे मोबाईल आढळल्याने अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ने १० डिसेंबर २०२२ रोजी ‘महामार्गावरून थ्राे; गांजाचे बॉल थेट कारागृहात’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून कारागृहाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा धोक्यात असल्याचे भाकीत वर्तविले होते. आता तर १८ ऑक्टोबर रोजी मोबाईल आणि १९ ऑक्टोबरला गांजा आढळून आल्याने कारागृहात ‘कुछ तो गडबड है’ याविषयी शिक्कामोर्तब झाले आहे. गुरूवारी पहाटे ६ वाजता गांजा आढळल्याप्रकरणी जनरल सुभेदार प्रल्हाद लक्ष्मण ईंगळे (५५) यांनी शुक्रवारी उशिरा रात्री फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दिली आहे.
सुभेदार ईंगळे हे आतील बाजुस हायवे समांतर तटाच्या भिंतीलगत टॉवर क्रमांक २ ते ३ क्रमांक दरम्यान संचारफेरी करत असताना त्यांना एक निळ्या रंगाचा चेंडू दिसून आला. यात १९ ग्राम गांजा आणि दोन नागपुरी खर्राच्या पुड्या आढळल्या. ईंगळे यांनी याबाबतची माहिती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना दिली. कीर्ती यांच्या
आदेशाप्रमाणे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हे दाखल करून गांजा जप्त केला आहे.
जनरल सुभेदार ईंगळे यांना तटालगत संचार फेरी करताना एक बॉल आढळून आला. यात गांजा व गुटखा होता. तटाच्या बाहेरील भागात पोलिस गस्तीसाठी पोलिस आयुक्तांना पत्र दिले जाईल. तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वरिष्ठांकडे मागणी केली जाणार आहे.
- कीर्ती चिंतामणी, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती