२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 22:15 IST2024-08-04T22:14:46+5:302024-08-04T22:15:19+5:30
आयत्या बिळाबर नागोबा - राणांचा आरोप : लोकांना किती मूर्ख बनविणार? कडूंचा पलटवार

२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला
अमरावती - चार वर्षांपासून बंद असलेल्या अचलपूर येथील फिनले मिलच्या पुनर्स्थापनेसाठी राज्य शासनाने २० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले. या श्रेयवादावरून अचलपूरचे आमदार बच्चू कडू व बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. रविवारच्या डीपीसी बैठकीत याचे पडसाद उमटले. बच्चू कडू हे आयत्या बिळावर नागोबा असल्याचा आरोप आ. राणा यांनी केला, तर राणा लोकांना किती मूर्ख बनविणार, असा पलटवार आ. कडू यांनी केला.
बैठकीत प्रारंभी आ. बच्चू कडू यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचलपूर येथील फिनले मिलला २० कोटींचा निधी उपलब्ध केल्याबाबत त्यांचा सत्कार केला. याच मुद्द्यावर बैठकीदरम्यान आ. रवी राणा यांनी ना. चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले. माजी खासदार नवनीत राणा व आपण स्वत: याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत एकाही पालकमंत्र्यांनी मिलसाठी निधी उपलब्ध केला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. पाटील यांनी यासाठी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. या मिलसाठी यापूर्वी नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला व बैठकी घेतल्याचे राणा म्हणाले.
अचलपूर मतदारसंघात पाच वर्षांत एकही उद्योग नाही. युवकांना शिक्षणासाठी सुविधा नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन नेत्यांना शिव्या घालणे, मोठमोठी आश्वासने देणे, शासनाचे अनुदान हडप करणे आदी बच्चू कडू यांचे उद्योग असल्याचा आरोप आ. राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला.
राणांच्या मतदारसंघात दोन मिल बंद : आ. बच्चू कडू
आ. रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघात विजय मिल, ग्रोवर्स मिल बंद आहेत. तेथील कामगार उपाशी मरत आहेत. राणा कुटुंबात एक आमदार, एक खासदार असताना काही करू शकले नाहीत. ज्या मिलसाठी आम्ही सातत्याने संघर्ष, पाठपुरावा केला, लक्षवेधी केली, तेथे वर्षभरापूर्वी २० कोटी मंजूर केले. कामगारांना ५० टक्के पगार दिला. राज्यमंत्री असताना प्रस्ताव पाठविला. खासदारपदी असताना नवनीत राणा लोकसभेत मिलसाठी चकार शब्द बोलल्या नाहीत. केंद्र सरकारच्या धोरणांचे खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा निंदनीय प्रकार आहे. काँग्रेसच्या काळात सुरू झालेली मिल भाजपच्या काळात बंद पडल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला.