‘जलयुक्त’मधील गावे हागणदारीमुक्त करा

By Admin | Updated: May 25, 2015 00:25 IST2015-05-25T00:25:22+5:302015-05-25T00:25:22+5:30

जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट झालेली गावे हागणदारीमुक्त करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी ....

Free the villages in 'Jalakti' | ‘जलयुक्त’मधील गावे हागणदारीमुक्त करा

‘जलयुक्त’मधील गावे हागणदारीमुक्त करा

जिल्हाधिकारी : जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी
तिवसा : जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट झालेली गावे हागणदारीमुक्त करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी जिल्हावासीयांना केले. तिवसा तालुक्यातील मोझरी येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.
जलयुक्त शिवार अभियानात पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधीही खर्च करीत आहे. मात्र ज्या गावांमध्ये अशी कामे सुरु आहेत, त्यातील काही गावांमध्ये आजही हागणदारी अस्तित्वात आहे. जलयुक्त शिवार अभियानात जास्तीत जास्त लोकसहभाग अभिप्रेत असून यामध्ये समाविष्ट गावांनी यानिमित्ताने गाव हागणदारीमुक्त करण्यावर भर द्यावा व प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी ग्रामस्थांना केले.
मोझरी व गुरुदेवनगर येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांची जिल्हाधिकारी व आमदारांनी पाहणी केली. मोझरी येथील सूर्यगंगा नदीवरील वसंत बंधारा, कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, तसेच गुरुदेव नगरातील सिमेंट नाला बांध आदींची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी कामांसाठी ग्रामस्थांनी एक पंचमांश रक्कम लोकवर्गणीतून जमा करावी. उर्वरित चार पंचमांश रक्कम शासन देईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसहभागातून गाव हागणदारीमुक्त करणे ही फारशी कठीण बाब नाही. त्यासाठी सर्वव्यापी प्रयत्नांचीच फक्त गरज आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी गीत्ते यांनी सांगितले.
यावेळी गुरुदेवनगर येथे तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्या हस्ते सिमेंट नाला खोलीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. नाला खोलीकरण करताना काढलेली माती पुन्हा नाल्यात जाऊ नये यासाठी माती धरुन ठेवणारी झाडे काठावर लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
यावेळी माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर, मोझरीच्या सरपंच विद्या बोडखे, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, तांत्रिक कृषी पर्यवेक्षक सचिन निस्ताने तसेच महसूल, कृषी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गुरुदेवनगर व मोझरीचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Free the villages in 'Jalakti'