माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 00:39 IST2025-07-08T00:37:36+5:302025-07-08T00:39:08+5:30

माजी मंत्री जगदिश गुप्ता हे दोन वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत

Former Minister Jagdish Gupta joins Shiv Sena presence of DCM Eknath Shinde | माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावती ठाकरे गटाला खिंडार

Jagdish Gupta joins Shiv Sena: अमरावतीचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर, ३ माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्ष नेता आणि ७ माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रिती बंड, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते. आजच्या पक्ष प्रवेशाने अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत झाली असून उबाठाला खिंडार पडले आहे. 

माजी मंत्री जगदिश गुप्ता हे दोन वेळा विधानसभेचे आणि दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. ते अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन वानखेडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोंधे, माजी विरोधी पक्ष नेता सुरेंद्र पोपली यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊळकर, डॉ. राजेश जयपूरकर या ७ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोमंतका, खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल, मराठा महासंघाचे अमरावती अध्यक्ष गणेशराव रेखे, शाहुसमाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. 

"शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे. लोकांच्या अडअडचणीला धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. घरी बसून सरकार चालवता येत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. आजच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना अमरावती जिल्ह्यात मजबूत झाली आहे. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असे ते म्हणाले. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.   

यावेळी पालघर जिल्ह्यातील एकता वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष भावेश संख्ये, प्रतीक जोशी, सुमीत बारी, मारुती आव्हाड, सोहम राजपूत यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते एकता वाहतूक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Former Minister Jagdish Gupta joins Shiv Sena presence of DCM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.