जिल्हाधिकाऱ्यांना नसलेला दिवा एसडीओंना कसा?
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर एसडीओंसह तहसीलदारांच्या शासकीय वाहनांवर अलीकडेच अंबर दिवा बघायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर मात्र हा दिवा नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर एकच चपटा डब्बारुपी निळा लाल असा फ्लॅश लाईट लागलेला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने २० फेब्रुवारी रोजी परतवाडा शहरात जिल्हाधिकारी जेव्हा दाखल झाले, तेव्हा तो दिवा नागरिकांना बघायला मिळाला. दरम्यान याच कोरोना काळात अचलपूरचे एसडीओ आणि तहसीलदार शहरात ज्या शासकीय वाहनातून फिरत आहेत, त्यावर मात्र उभा पिवळसर रंगाचा अंबर दिवा झळकत आहे. या वाहनांवर हा अंबर दिवा असला तरी परिवहन विभागाकडून आवश्यक असलेले स्टिकर त्यावर लागलेले नाही. तहसीलदार ज्या अंबर दिव्यांच्या नव्या कोऱ्या वाहनातून फिरत आहेत, त्यावर तर नंबरही नाही.
या अंबर दिव्यामुळे शासकीय यंत्रणा आणि सामान्य माणसांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या अंबर दिव्याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहेत. जो दिवा जिल्हाधिकाऱ्यांना नाही. तो अचलपूर एसडीओंसह तहसीलदारांना कसा यावरही बोलले जात आहे.
यापूर्वी याच एसडीओ व तहसीलदारांच्या शासकीय वाहनांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाप्रमाणे चापट डबारुपी निळा, लाल फ्लॅश लाईट नागरिकांनी बघितला आहे. पण कोरोना काळातील हा दिव्याचा बदल बघता अचलपूर एसडीओ व तहसीलदारांना दर्जावाढ मिळाला की काय? जिल्ह्यातील अन्य एसडीओ, तहसीलदारांपेक्षा जादाचे विशेषाधिकार प्राप्त झालेत की काय? यावरही नागरिक मत मांडत आहेत. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत एसडीओ तहसीलदार आपल्या शासकीय वाहनांवर अंबर दिवा लावू शकतात, असा एक मतप्रवाहही या अंबरदिव्याच्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचलित आहे. मग जिल्हाधिकारी तर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यांना या अंबर दिव्याची गरज नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.