आधी शेतकरी राजकारण्यांच्या कर्जमाफीच्या घोषणांना भुल्ले आणि आता व्याजमाफीलाही मुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:00 IST2025-04-08T14:57:27+5:302025-04-08T15:00:07+5:30

Amravati : मार्चअखेर पीक कर्जाचा भरणा नसल्याने हजारो शेतकऱ्यांना फटका

First, farmers forgot politicians' loan waiver announcements and now they are missing out on interest waivers too. | आधी शेतकरी राजकारण्यांच्या कर्जमाफीच्या घोषणांना भुल्ले आणि आता व्याजमाफीलाही मुकले

First, farmers forgot politicians' loan waiver announcements and now they are missing out on interest waivers too.

गजानन मोहोड 
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
राजकारणातील घोषणांच्या आतषबाजीत शेतकऱ्यांची फसगत होत आहे. कर्जमाफी होणार असल्याच्या चर्चेने जिल्हा बँकेच्या १३ हजार नियमित खातेदारांनी ३१ मार्चच्या आत पीक कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना शून्य टक्के व्याजमाफीला मुकावे लागले. आता ३० जूनपर्यंत ८.७५ टक्के व त्यानंतर थकबाकीदार राहिल्यास ११.७५ टक्के व्याजाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे वास्तव आहे.


गतवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा उच्चांकी ५५ हजार ३४२ शेतकऱ्यांना ६४७.३० कोटींच्या खरीप पीक कर्जाचे वाटप केले. हे वाटप सरासरीच्या १०४ टक्के होते. प्रत्यक्षात जिल्हा बँकेला ६२० कोटींच्या कर्जवाटपाचा लक्ष्यांक होता. त्या तुलनेत २७.३० कोटींचे जास्त कर्जवाटप करण्यात आले. त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी व नियमित खातेदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिल्याने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला व कर्जवाटपाचा टक्का वाढला होता. 


त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीद्वारे कर्जमाफीची घोषणा केली व त्याला प्रत्युत्तर देत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनीही कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्याने कर्जमाफी द्यावी, यासाठी विविध पक्षांद्वारा आंदोलने होत आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफी होणार, या आशेमुळे हजारो शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी शून्य टक्के व्याजमाफीला मुकले आहेत.


११.७५ टक्के व्याजाचा भुर्दंड ३० जूनपूर्वी पीक कर्जाचा भरणा न केल्यास खातेदारांना बसणार आहे. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ खातेदारांना मिळेल.


थकीत कर्जानी वाढला बँकांचा एनपीए
जिल्हा बँकेसोबत राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही हीच परिस्थिती असल्याने थकीत कर्जाचा आकडा फुगत चालला आहे व यामुळे बँकांची आर्थिक कोंडी होत आहे. शिवाय 'एनपीए' देखील वाढत असल्याची वस्तुस्थिती आहे. बँकांचे खातेदार थकबाकीदार असल्याने यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाची गती मंदावणार आहे.


३० जूनपर्यंत व्याजात ३ टक्के सवलत
३१ मार्चपर्यंत पीक कर्जाचा भरणा केल्यास शून्य टक्के व्याज सवलत मिळते. त्यानंतर १ एप्रिल ते ३० जून दरम्यान ८.७५ टक्के व्याजाची आकारणी होईल. यामध्ये व्याज सवलत योजनेच्या ३ टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळतो. त्यानंतर मात्र ११.७५ टक्के व्याजाची आकारणी होते.


जिल्हा बँकेची कर्ज मागणी (लाखात)
सभासद खातेदार (चालू) - ५५४१०
खातेदारांची रक्कम - ६४७१४
थकबाकी खातेदार - ४९३९६
थकबाकी रक्कम - ३५४९८.६८


कर्जवसुली (लाखात/३१ मार्च)
सभासद खातेदार (चालू) : ४२३८५
खातेदारांची रक्कम : ४९५७४.३८
थकबाकी खातेदार : ९०५
थकबाकी रक्कम : २८४२.०२


"नियमित खातेदारांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा न केल्याने त्यांना शून्य टक्के व्याजमाफीपासून वंचित राहावे लागले. आता १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत ८.७५ टक्क्यांनी व्याज आकारणी होईल."
- शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक


"नियमित खातेदारांना पुन्हा एक संधी आहे. त्यांनी ३० जूनपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास ३ टक्के व्याजाची सवलत मिळेल. त्यानंतर थकीत कर्जावर ११.७५ टक्के व्याजाची आकारणी होईल."
- अभिजीत ढेपे, उपाध्यक्ष, जिल्हा बँक

Web Title: First, farmers forgot politicians' loan waiver announcements and now they are missing out on interest waivers too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.