अखेर मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमातील ‘दहशतवादी’ शब्द वगळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 19:32 IST2019-01-31T19:19:36+5:302019-01-31T19:32:57+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयाच्या पुस्तकातील ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्यात आला आहे.

अखेर मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमातील ‘दहशतवादी’ शब्द वगळला
अमरावती - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आधुनिक भारताचा इतिहास या विषयाच्या पुस्तकातील ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्यात आला आहे. याबाबत कुलसचिवांच्या स्वाक्षरीने पत्र निर्गमित करण्यात आले. २९ जानेवारी रोजी पत्रव्यवहारदेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती व नागपूर येथील महानगरमंत्र्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुक्त विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी रोजी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागणीनुसार मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.भाग २ च्या अभ्यासक्रमातील आधुनिक भारताचा इतिहास पुस्तक क्रमांक २ ‘राष्ट्रीय चळवळ : १८८५-१९४७’ मधील घटक क्रमांक ४ या शीर्षकातील व मजकुरातील ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले. ‘दहशतवादी’ शब्द वगळण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्यासंदर्भात अमरावती, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड येथील विभागील संचालकांना प्राप्त झाले आहे.
बी.ए. शिक्षणक्रमाच्या इतिहास पुस्तकातील वादग्रस्त ‘दहशतवादी’ हा शब्द वगळण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कुलसचिव दिनेश भोंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्रदेखील प्राप्त झाले. अभाविपची मागणी त्वरेने पूर्णत्वास यावी, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला.
- अंबादास मोहिते,
विभागीय संचालक, मुक्त विद्यापीठ, अमरावती