तालुका सहकारी संस्था करणार नाफेडची खरेदी : दलाल, व्यापारी सक्रिय
नरेंद्र जावरे
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उडीद, मूग या शेतमालाच्या नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया अचलपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षांत तालुक्यातील दोन मोठ्या संस्था काळ्या यादीत टाकण्यात आल्या होत्या. त्यातील तालुका शेतकी खरेदी संस्था काळ्या यादीतून बाहेर काढण्यात आली आहे.
दीड महिन्यांपासून कोणत्या सहकारी संस्थेला शेतमाल खरेदी करण्याचे आदेश नाफेडमार्फत दिले जातात, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. २०१७-१८ या आर्थिक वर्षात अचलपुर तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेत मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून सदर संस्था काळ्या यादीत टाकण्यात आली होती. संपूर्ण संचालक मंडळाविरुद्ध अचलपूर पोलिसांत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जिल्हा मार्केटिंग अधिकारी व अचलपुर पोलिसांनी केला. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र चौकशीअंती कुठल्याच प्रकारची आर्थिक अनियमितता न झाल्याचे दाखले दिल्यानंतर शासनाच्या एका आदेशाने अचलपूर तालुका खरेदी विक्री संस्थेला काळया यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी या संस्थेला अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, उडीद या शेतमालाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी आदेश देण्यात आले आहेत.
बॉक्स
पुन्हा साखळी नकोच
अचलपुर तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेला ऑनलाइन शेतमालाला नोंदणीचे आदेश प्राप्त होताच सदर संस्थेमार्फत प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल कमी दरात खरेदी करून त्यांच्याच नावाने ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी दलाल व काही व्यापारी सक्रिय झाले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी करून निकृष्ट दर्जाचा शेतमाल टाकण्याचा त्यांचा हा धंदा आहे. तो रोखण्यासाठी सदर संस्थेने योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी नोंदविले आहे.
कोट
अचलपूर शेतकी सहकारी संस्थेला शासनाच्या एका आदेशानुसार मागेच काळ्या यादीबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नाफेड अंतर्गत शेतमाल खरेदी संदर्भात आदेश देण्यात आले आहे.
- कल्पना धोपे,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी
कोट
आमच्या संस्थेला शासनाने सोयाबीन, उडीद, मूग पिकाचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार खरेदी प्रक्रिया राबविण्यात येईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी.
- संतोष चित्रकार,
व्यवस्थापक,
अचलपूर सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था