सांभाळ करीत नसल्याची तक्रार केल्याने पित्यावर केला बत्त्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:23 IST2024-10-23T13:22:24+5:302024-10-23T13:23:11+5:30
Amravati : भामोद येथे संतापलेल्या मुलाचे कृत्य; येवदा पोलिसांकडून आरोपीला अटक

Father was stabbed with a batta for complaining that he was not taking care of him
लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा/दर्यापूर : वृद्धापकाळात मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार नातेवाइकांमध्ये करणाऱ्या वयोवृद्ध पित्याला संतापलेल्या मुलाने मध्यरात्री लोखंडी बत्त्याने डोक्यावर अनेक वार करून संपविले. भामोद येथे संपन्न कुटुंबात ही घटना घडली. मंगळवारी पहाटे येवदा पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.
पोलिस सूत्रांनुसार, रामकृष्ण सदाशिव कात्रे (६०) असे मृताचे, तर अतुल रामकृष्ण कात्रे (४०) मुलाचे नाव आहे. हत्येच्या एक दिवसापूर्वी सोमवारी सकाळी दर्यापूर येथे दोघेही बाप-लेक बँकेत गेले होते. तेथील कामे आटपून दोघेही भामोद येथे सोबतच ते परतले. मध्यरात्रीच्या सुमारास बापलेकातील वादावादीअंती संताप अनावर झालेल्या अतुलने रामकृष्ण यांच्यावर बत्त्याने डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रामकृष्ण कात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घरात आरोपी अतुलची पत्नी व मुलगी असे चौघेच घरी होते.
मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रामकृष्ण कात्रे हे घरात खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. अतुल कात्रे हादेखील घटनास्थळी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, ठाणेदार विवेक देशमुख, सहायक उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलिस कर्मचारी पंकज नळकांडे, शरद सारसे, अनिल भटकर, प्रवीण वानखडे, अमोल केंद्रे, धनंजय डोंगरे, रोशन टवलारे, मुकेश मालोकार, सुनीता चव्हाण, जयश्री लांजेवार यांनी पंचनामा केला.
मुलगा सांभाळ करीत नाही
कात्रे कुटुंबात २४ एकर शेती आहे. मृत रामकृष्ण कात्रे यांच्या पश्चात तीन विवाहित मुली व अतुल हा मुलगा आहे. मुलगा आपला व्यवस्थित सांभाळ करीत नसल्याचे नातेवाइकांमध्ये ते वारंवार सांगत होते. त्याचा राग अतुलच्या मनात होता. तो सोमवारी रात्री त्यांच्यात झालेल्या वादादरम्यान उफाळून आला आणि त्याची परिणती रामकृष्ण यांच्या हत्येत झाली. त्याची कबुली अतुलने पोलिसांना जबाबात दिली. त्यावरून त्याला अटक करून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास येवद्याचे ठाणेदार विवेक देशमुख व कर्मचारी करीत आहेत.