स्वतःच्याच मुलाचा मर्डर लपवून, पित्याने केला आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न; भावानेच संपवले भावाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:21 IST2026-02-27T15:18:47+5:302026-02-27T15:21:02+5:30
Amravati : १२ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने केवळ चार तासांत हाणून पाडला. भातकुली परिसरात घडलेली ही घटना प्रत्यक्षात अपघात नसून 'कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Father tried to save the accused by hiding his own son's murder; brother ended up killing his brother
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १२ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेने केवळ चार तासांत हाणून पाडला. भातकुली परिसरात घडलेली ही घटना प्रत्यक्षात अपघात नसून 'कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी क्राईमच्या पथकाने मृताच्या २२ वर्षीय नातेवाईक आरोपीला गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले असून, मृताच्या वडिलांनी अपघाताचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. जितेराजा अरुण गौड (१२) असे मृताचे नाव आहे.
भातकुली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आरोपी बब्बू विश्वनाथ गौड (२२) व अरुण गौड (४२) या दोघांविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी व मृत मुलगा हे परस्परांचे मावस व चुलतभाऊ आहेत. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सायगड (ता. बंडा) येथील काही कुटुंबे सध्या भातकुली परिसरात साड्या विक्रीच्या व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११:४८ च्या सुमारास अरुण गौड यांनी भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, त्यांचा मुलगा जितेराजा गौड आणि नातेवाईक बब्बू गौड हे भातकुली ते चेचरवाडी रोडवरील पुलाजवळ पाणी आणण्याकरिता जात असताना एका अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात जितेराजाचा मृत्यू झाला, तर बब्बू जखमी झाला, असे नमूद करण्यात आले होते. सबब, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला होता.
आरोपी घरचाच, म्हणून दडविला खून
धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या वडिलांनी या हत्येला अपघाताचे स्वरूप दिले. आरोपीने जितेराजाला पालाजवळ मारहाण केल्याचे समोर आले आहे. घरचीच गोष्ट असल्याने आपण त्या प्रकरणाला अपघाताचे वळण दिल्याची कबुली मृताच्या पित्याने दिली.
जेवणाच्या कारणावरून झाली हत्या
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बब्बू बिसनाथ गौड याने खुनाची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सामिष जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून रागाच्या भरात बब्बूने ११ वर्षीय जितेराजावर पाल ठोकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळईने वार करून त्याची हत्या केली. सध्या आरोपी पोलीस निगराणीत असून त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे एपीआय मनीष वाकोडे व महेश इंगोले यांच्या पथकाने पार पाडली. याप्रकरणात भातकुली पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा नोंदविला. त्यात आता खून न खुनाचा पुरावा नष्ट करण्याचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे.
असा उघड झाला बनाव
सुरुवातीला भातकुली पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि मृत जितेराजाच्या अंगावरील जखमा पाहून गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण यांना संशय आला. मुलाच्या अंगावरील जखमा या अपघाताच्या नसून एखाद्या धारदार शस्त्राने केल्यासारख्या दिसत होत्या. गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि मृताचे वडील व नातेवाइकांना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली. चार तासांच्या चौकशीनंतर सत्य बाहेर आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या आरोपी बब्बू याला पोलिस निगराणीत ठेवण्यात आले. ठाणेदार रविंद्र राजुलवार यांनी आरोपी अरूणला अटक केली.