गत २२ दिवसांपासून गायब झालेला पाऊस हल्ली कोसळत असल्याने सोयाबीन, ज्वारी, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, अधिक पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नजीकच्या लोणी येथील अशोक वानखडे नामक युवा शेतकरी हे शनिवारी सकाळी येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत चारचाकी वाहनाने कोबी विक्रीसाठी घेऊन आले. मात्र, बाजार समितीत येण्यास विलंब झाला. त्यामुळे कोबी भरून आणलेल्या वाहनाला बाजार समितीत प्रवेश मिळाला नाही. वाहनात आणलेली कोबी परत घेऊन जाणे वाहन भाड्याला परवडणारे नव्हते. अखेर बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच या शेतकऱ्याने कोबी पाच रुपये नगाने विकून किमान वाहतूक भाडे तरी निघावे, यासाठी शक्कल लढविली. मात्र, मातीमाेल भावाने कोबी विकूनही वाहतूक खर्च निघाला नाही, अशी कैफीयत शेतकरी वानखडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. एरवी २५ ते ३० रुपये किलो दराने विकणारी कोबी पाच रुपयांमध्ये मिळत असल्याने ग्राहकांच्यादेखील खरेदीसाठी उड्या पडल्या.
शेतकऱ्याने बाजार समितीपुढेच विकली कोबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST