धावण्याची शिक्षा दिली, जमिनीवर कोसळून माजी सैनिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:34 IST2025-05-30T10:34:29+5:302025-05-30T10:34:47+5:30

मृत्यूची 'एसआयटी' मार्फत चौकशीची पत्नीची मागणी

Ex soldier undergoing training at Dhule Police Training Center dies | धावण्याची शिक्षा दिली, जमिनीवर कोसळून माजी सैनिकाचा मृत्यू

धावण्याची शिक्षा दिली, जमिनीवर कोसळून माजी सैनिकाचा मृत्यू

परतवाडा (अमरावती) : धुळे येथे पोलिस प्रशिक्षणादरम्यान चुकीची शिक्षा म्हणून दौड लावत असताना सावळापूर येथील माजी सैनिक कोसळला. डोक्याला मार लागल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्याने हेतुपुरस्सर ही शिक्षा दिल्याचा आरोप करीत 'एसआयटी' मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मृताच्या पत्नीने केली आहे. गुरुवारी शासकीय इतमामात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर सावळापूर येथे अंत्यसंस्कार पार पडले.

पंकज लक्ष्मणराव घावट (४३, रा. सावळापूर, ता. अचलपूर, ह. मु. गजानन धाम, अमरावती) असे धुळे येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीत दगावलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नागपूर शहर पोलिसात निवड झाली. धुळे येथील नऊ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी संपण्यास १० दिवस शिल्लक होते.

कोसळल्याने डोक्याला मार लागला

२८ मे रोजी चुकीची शिक्षा म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यासह २५ रिक्रूटना दौड लावण्याची शिक्षा दिली. प्रकृती ठीक नसल्याचे सांगितल्यावरही शिक्षेत सूट मिळाली नाही.

दौड लावत असताना अचानक कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी रूपाली (३६), मुलगा रुण्मय (९), मुलगी राजवी (६), भाऊ भूषण, बहिणी आहेत.

देशसेवेनंतर निवडला पोलिस

विभाग पंकज घावट सैन्य दलातील आर्टिलरी गनर रेजिमेंटमधून निवृत्त झाल्यानंतर दहा महिन्यांपूर्वी नागपूर शहर पोलिस दलामध्ये भरती झाले होते. त्यांचे धुळे येथील प्रशिक्षणाची पासिंग आऊट परेड ९ जून रोजी होणार होती. त्यानंतर ते नागपूर पोलिस दलात कर्मचारी म्हणून कार्यरत होणार होते.

जबरीने धावायला लावले 

धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात २८ मे रोजी सकाळी शिक्षा म्हणून प्रशिक्षणार्थीना २६ किलोमीटर धावायला लावले. धावण्यास त्रास होत असल्याचे पंकज घावट यांनी उपस्थित अधिकाऱ्याला सांगितले होते. परंतु, त्यांना जबरीने धावायला लावले, असा आरोप करीत पत्नी रूपाली यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
 

Web Title: Ex soldier undergoing training at Dhule Police Training Center dies