आठ विद्यार्थी रोमानिया हंगेरीमध्ये सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:01 IST2022-03-03T05:00:00+5:302022-03-03T05:01:02+5:30
युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी नागपूरला विमानाने पाठविण्यात येणार आहे. आम्ही त्याला आणायला जात असल्याचे त्याची आई अर्चना पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आठ विद्यार्थी रोमानिया हंगेरीमध्ये सुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : युक्रेनमधून आठ विद्यार्थी सीमापार हंगेरी व रोमानियामध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी ते सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय एक विद्यार्थी बुधवारी दुपारी दिल्लीला पोहोचला व गुरुवारी नागपूरला व नंतर अमरावतीला येणार असल्याची माहिती त्याच्या परिवाराने दिली. उर्वरित विद्यार्थ्यांच्या मायदेशी परतण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले होते. तेथे युद्धस्थिती होताच दोघे भारतात परतले. यानंतर बुधवारी रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून विमानाने स्वराज पुंड हा विद्यार्थी दुपारी दिल्लीत परतला आहे. त्याला गुरुवारी नागपूरला विमानाने पाठविण्यात येणार आहे. आम्ही त्याला आणायला जात असल्याचे त्याची आई अर्चना पुंड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ गजभिये, प्रणव भारसाकळे, मोहम्मद नोमान महम्मद रिझवान, कुणाल कावरे व नेहा लांडगे यांनी युक्रेनची सीमा पार करून लगतच्या रोमानिया व हंगेरी या देशात पोहोचले असल्याचे नियंत्रण कक्षाने सांगितले. काही विद्यार्थ्यांशी व त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी पुष्टी केली. आम्ही सुरक्षित आहोत, दूतावासाचे व येथील नागरिक, एनजीओंचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ईस्टमधून वेस्ट युक्रेनचा १५०० किमीचा प्रवास
ईस्ट युक्रेनमधून वेस्ट युक्रेनमध्ये जाण्यासाठी १५०० किमी व ३३ तासांचा प्रवास करावा लागला. त्यानंतर बुधवारी आम्ही हंगेरीत पोहोचलो आहे. या प्रवासात केवळ शेवटच्या स्टेशनवर ब्रेडची व्यवस्था झाली. बुडापेस्ट या शहरात दूतावासातर्फे आमची एका हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच आम्ही मायदेशी पोहोचू, असे प्रणव भारसाकळे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचा स्वराजशी संवाद
युक्रेनमधून रोमानिया व तेथून भारतात परतलेल्या स्वराज पुंड याच्यासोबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला व त्याच्या प्रवासासह तेथील परिस्थिती जाणून घेतली. यासोबतच भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी (दिघडे) यांनीदेखील त्याची चौकशी करून भारतात परतल्याबाबत त्याचे स्वागत केल्याचे सांगण्यात आले.