मानवी हस्तक्षेपामुळेच जंगलात वणवा ?

By Admin | Updated: March 29, 2017 00:14 IST2017-03-29T00:14:08+5:302017-03-29T00:14:08+5:30

मेळघाटच्या संरक्षित व लगतच्या मध्यप्रदेशाच्या हद्दीतील जंगलात मागील आठवडाभरापासून आगीच्या घटना घडत आहेत.

Due to human intervention in the forest? | मानवी हस्तक्षेपामुळेच जंगलात वणवा ?

मानवी हस्तक्षेपामुळेच जंगलात वणवा ?

अतिसंरक्षित क्षेत्राला झळ : वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या गावागावांत बैठका
चिखलदरा : मेळघाटच्या संरक्षित व लगतच्या मध्यप्रदेशाच्या हद्दीतील जंगलात मागील आठवडाभरापासून आगीच्या घटना घडत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून मानवी वस्त्यांकडे कूच करीत आहेत. वणव्याच्या घटनेनंतर सोमवारी रात्री दहा वाजता जंगल सोडून आलेला बिबट घटांग-कुकरू मार्गावर दिसून आला.
घटांग आणि मध्यप्रदेशच्या कुकरू खोऱ्यात चार दिवसांपासून ठिकठिकाणी वणवा धुमसत आहे. घटांग वनपरिक्षेत्रातील आग विझविण्याचे आव्हान आहे तर दुसरीकडे भुलोरी, मसोंडी या अतिसंरक्षित व्याघ्रक्षेत्रातील आगीमुळे वन्यप्राणी सैरावैरा जंगल सोडून पळू लागले आहेत. सोमवारी रात्री १०.२० वाजता काटकुंभ, चुरणी येथील राहुल येवले, पियूष मालवीय, अभिजित येवले, विकी राठोड यांना बिबट दिसला. त्याची छायाचित्रेही त्यांनी काढली आहेत. यासोबतच अन्य वन्यप्राणीदेखील आगीच्या धाकाने रस्त्यावर येऊ लागले आहेत.
उन्हाळ्याच्या सुरूवातीपासूनच संरक्षित मेळघाट वनविभागाच्या पूर्व आणि पश्चिमसह अतिसंरक्षित सिपना, गुगामल व अकोट वन्यजीव विभागात जंगलांमध्ये आगी लागत आहेत.

‘सॅटेलाईट’ची मदत, वॉकीटॉकी धूळखात
अमरावती : पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग, अंजनगाव परिक्षेत्रातील अंबापाटी, नागझिरा, टेंब्रुसोंडा, दक्षिण सावऱ्या, भुलोरी, सलोना, घटांग, चुनखडीसह मध्यप्रदेशच्या कुकरू बिटमधील जंगलात आठवडाभरापासून दररोज विविध ठिकाणी आगी लागल्या आहेत. याच परिसरात रविवारी दुपारी २ वाजतापासून लागलेली आग सोमवारी कशीबशी नियंत्रणात आली. मात्र, सोमवारी रात्री घटांग, कुकरू खोऱ्यात आगीने उग्ररुप धारण केले होते.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना गावकऱ्यांची मदत घ्यावी लागते. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात आगी लागत असल्याचे मानले जात आहे. मोहफुले, तेंदूपाने वेचण्यासाठी व गुरांच्या चाऱ्यासाठी तसेच सागवान तस्करीसाठी आगी लावण्यात येतात. यामुळे गावकऱ्यांकडून आग लावणाऱ्यांची माहिती घेण्यासाठी गावागावांत बैठकी घेतल्या जात आहेत.
आगीची माहिती तत्काळ वनाधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सॅटेलाईट यंत्रणेची मदत वन,व्याघ्र प्रकल्पाद्वारे घेतली जात आहे. मात्र, घटनास्थळाजवळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत माहिती वेळेवर पोहोचत नाही. दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांशी संपर्कासाठी वायरलेस यंत्रणेचा आधार घेणे अपेक्षित आहे. मात्र, ही यंत्रणा कर्मचारी वापरत नसून ती धूळखात असल्याचे चित्र आहे. अन्य यंत्रणांनी अत्याधुनिकतेची कास धरली असताना वन विभाग मात्र ब्रिटीशकालिन नियमावलीवरच कारभार हाकत आहे. परिणामी वनांच्या संरक्षणासाठी असलेली संयंत्रे ही कालबाह्य झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

मेळघाट, मध्यप्रदेशच्या कुकरु जंगलात आगी लावण्यात येत आहेत. क्षेत्रीय कर्मचारी गावकऱ्यांच्या मदतीने आग विझवित आहेत. घटांग क्षेत्रातील तीन हेक्टर जंगल जळाले.
- एस. युवराज, उपवनसंरक्षक,
पूर्व मेळघाट वनविभाग, चिखलदरा

शासनाने मोहफुलाचे ‘ओपन ट्रेडिंग’ केले आहे. यामुळे जंगलात आग लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगीमुळे जमिनीचे पोत घसरते व प्राण्यांची तसेच वनसंपत्तीची हानी होते.
-स्वप्नील सोनोने,
वन्यजीव अभ्यासक

सोमवारी रात्री १०.२० वाजता परतवाडा-घटांग मार्गे काटकुंभ गावी जात असताना घटांग ते कुकरु रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिले. जंगलात आग असल्याने वन्यप्राणी रस्त्यावर आले आहेत.
- पीयूष मालवीय,
काटकुंभ.

Web Title: Due to human intervention in the forest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.