आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा बँकेची ‘झडती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST2021-06-26T05:00:00+5:302021-06-26T05:00:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्याच्या ...

आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा बँकेची ‘झडती’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची झाडाझडती घेतली. तेथून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या १५ जून रोजीच्या तक्रारीवरून बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकारी, कर्मचारी व सहा ब्रोकर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा तपास शहर कोतवाली पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे सहकाऱ्यांसह शुक्रवारी ३.३० च्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पोहोचले. तेथे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश कोलवाडकर यांच्याशी चर्चा केली. बँकेतील अधिकारी नितीन दामले यांच्यासोबत बॅँकेच्या तळमजल्यावरील लेखा शाखेत जाऊन प्रकरणाशी संबंधित दस्तावेज तपासकामासाठी ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचल्याने बँकेत मोठी खळबळ उडाली. एक तास पोलीस पथक बँकेत होते. ३.३९ कोटी रुपये दलाली दिल्याने बँकेची फसवणूक झाली, असे तक्रारीत नमूद आहे.
अटकसत्र सुरू होण्याची शक्यता
शुक्रवारी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आला. निरीक्षण व अभ्यासाअंती लवकरच अटकसत्र सुरू होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविली.