शेती अवजारांची रक्कम होणार बँक खात्यात जमा

By Admin | Updated: September 5, 2016 00:30 IST2016-09-05T00:30:11+5:302016-09-05T00:30:11+5:30

शेतकऱ्यांना महामंडळामार्फत विविध प्रकारची अवजारे अनुदानाच्या माध्यमातून दिली जातात.

Deposit of bank account will be the amount of agricultural equipment | शेती अवजारांची रक्कम होणार बँक खात्यात जमा

शेती अवजारांची रक्कम होणार बँक खात्यात जमा

कृषिमंत्र्यांचे निर्देश : कृषी औद्योगिक महामंडळाला सूचना
अमरावती : शेतकऱ्यांना महामंडळामार्फत विविध प्रकारची अवजारे अनुदानाच्या माध्यमातून दिली जातात. मात्र बरेचदा या अवजारांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात. काही ठिकाणी ते वेळेवरदेखील उपलब्ध होत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांना शेतीपयोगी अवजारासाठीची अनुदानित रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, अवजार पुरविण्यासाठी निश्चित धोरण ठरवावे, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिल्याचे या विभागातील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या बैठकीत कृषिमंत्र्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्याच्या सूचना दिल्यात. खत उत्पादनासाठी महामंडळाचे राज्यात सहा ठिकाणी कारखाने आहेत. महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकेदेखील उत्पादित केली जातात. दरवर्षी चार लाख किलो कीटकनाशकांची निर्मिती केली जात असून ही कीटकनाशके खुल्या बाजार विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. (प्रतिनिधी)

प्रत्येक तालुक्यात सेवा केंद्र
प्रत्येक तालुक्यात कृषी अभियांत्रिकी सेवा केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याद्वारे शेतकऱ्यांना एकाच छताखाली अवजारे, कीटकनाशके, खते, दुरूस्ती या सुविधा मिळतील. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. याशिवाय कृषी प्रक्रिया उद्योगात राज्याचा वाटा १३ टक्के आहे तर राज्य हे फळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्लस्टरनिहाय प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कृषी औद्योगिक महामंडळाने नोडल एजन्सी बनवणे अशा प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

खताची किंमत ५० रुपयांनी घटणार
महामंडळनिर्मित खताच्या एका बॅगसाठी ८८५ रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. मात्र येत्या रबी हंगामापासून महामंडळनिर्मित १८:१८:१० या खताची किंमत प्रतिबॅग ५० रुपये कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Web Title: Deposit of bank account will be the amount of agricultural equipment