अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चाैकशी करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेखालील गठित चौकशी पथकाने रविवारी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांचे बयाण नोंदविण्यास तब्बल सहा तास घेतले. सायंकाळी ४.३० ते रात्री १०.३० या वेळेत विविध मुद्द्यांवर पथकाने प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात माहिती जाणून घेतली, हे विशेष.
राज्याच्या वनमंत्रालयाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी ३१ मार्च रोजी पत्र निर्गमित करून दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याची जबाबदारी अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविली. तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी विहित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे अनुपालन केले अथवा नाही, याबाबत सखोल चौकशी करून या आयपीएस चौकशी पथकाला ३० एप्रिलपर्यंत शासनाकडे अहवाल सादर करावा लागणार आहे. त्याअनुषंगाने आयपीएस पथकाचे चार सदस्य २१ ते २४ एप्रिल दरम्यान मेळघाटच्या हरिसाल येथे डेरेदाखल होते.
मुंबई येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात या चमूने दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे गोळा केली आणि हरिसाल येथील वनकर्मचाऱ्यांचे बयाणसुद्धा नोंदविले आहे. २५ एप्रिल रोजी हे चौकशी पथक अमरावती येथे दाखल झाले. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात चारही सदस्यांचा मुक्काम आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे पथक दक्षता बाळगून चौकशी करीत आहे. या पथकाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रेड्डींसंदर्भात कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दीपाली यांच्या चार पानी सुसाईड नोटच्या आधारे व्याघ्र प्रकल्पातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांचे बयाण नोंदविण्यास पथकाने सहा तास घेतल्याची माहिती आहे.
दीपाली चव्हाण यांची वनपरिक्षेत्र अधिकारीपदी नोकरी, लग्न, कौटुंबिक वातावरण, हरिसाल येथील त्यांचे कर्तव्य, विनोद शिवकुमार याचा त्रास, सुटी न देण्याचे कारण, गर्भधारणा, श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे मागितलेली दाद, बदलीबाबतचे निवेदन असा एकंदर घटनाक्रम आयपीएस चौकशी पथकाने प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात विचारपूस करताना नोंदवून घेतला. रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याला सहकार्य करण्याची कारणमीमांसासुद्धा या पथकाने नोंदविल्याची माहिती आहे.
------------------
आयपीएस डॉ. प्रज्ञा सरवदे अमरावतीत पोहोचल्या
अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे या सोमवारी सायंकाळी अमरावती येथे पोहोचल्या आहेत. येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहात त्या थांबल्याची माहिती आहे. दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी यांच्या भूमिकेविषयी चौकशी करण्यासाठी त्या दाखल झाल्या आहेत. मंगळवारी त्या हरिसाल येथे चौकशीकरिता जाणार आहेत. दोन ते तीन तास चौकशी करून पुन्हा त्या अमरावती येथे येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.