पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 17:51 IST2019-07-14T17:46:53+5:302019-07-14T17:51:47+5:30
पाऊस बेपत्ता : रोपांना टँकरने पाणीपुरवठा

पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’, 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट
गणेश वासनिक
अमरावती : गत आठवड्याभरापासून पाऊस बेपत्ता झाल्याने राज्यात 1 जुलैपासून सुरू झालेल्या 33 कोटी वृक्षलागवडीला विदर्भात ब्रेक लागले आहे. एकूणच वृक्षलागवड कार्यक्रमावर संकट ओढवले असून, बहुतांश भागात रोपांना टँकरने पाणीपुरवठा करून ती जगविली जात आहेत.
राज्यात विदर्भ वगळता अन्य ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड राबविण्यात येत आहे. मात्र, विदर्भातून 4 ते 5 जुलैपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांसह वनविभागालासुद्धा वरूणराजाची प्रतीक्षा लागून आहे. वनविभागाला जुलै महिन्यात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. तथापि, पाऊस गायब झाल्याने वृक्षलागवडीचे नियोजन कसे पूर्ण करणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर व अमरावती विभागात 10 ते 12 टक्केच वृक्षलागवड झाली आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी ते सव्वा कोटी असे वृक्षलागवडीचे टार्गेट आहे. परंतु, पावसाने दडी मारल्याने विदर्भात एकूणच वृक्षलागडीचे नियोजन बारगळले आहे. गोंदिया, भंडारा जिल्हा वगळता अन्य जिल्हे वृक्षलागवडीत माघारले आहे. अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याची विदारक स्थिती आहे.
रोपांना टँकरने पाणीपुरवठा
33 कोटी वृक्षलागवडीकरिता नर्सरीतून रोपे मागविण्यात आलीत. मात्र, पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षलागवडसुद्धा लांबली. आता ‘स्पॉट’वर रोपे जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही स्थिती संपूर्ण विदर्भाची आहे. वृक्षलागवडीनंतर रोपांना जगविणे वनविभागासह शासनाच्या अन्य यंत्रणांसाठी मोठे जिकरीचे काम झाले आहे.
आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणातून मागविली रोपे
राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीसाठी सागवानची रोपे आंध्रप्रदेश, केरळ, तामिनलाडू, तेलंगणा येथून मागविली आहे. 50 टक्के वृक्षलागवड ही सागवान रोपांचे करण्याचे नियोजन आहे. मात्र, राज्यात सागवान रोपांची निर्मिती कमी प्रमाणात झाली. त्यामुळे परप्रातांतून सागवान रोपे मागविण्यात आली आहे. सागवान रोपांना जगविण्यासाठी वनविभागाला कसरत करावी लागत आहे.
विदर्भात पावसाचे दिवस लक्षात घेता आणि हवामान खात्याशी संपर्क साधून वृक्षलागवड करण्याचा सूचना दिल्या आहेत. मोठ्या स्वरूपाची वृक्षलागवड थांबविली असून, छोट्या स्वरूपाची वृक्षलागवड सुरू राहील.
- सुधीर मुनगंटीवार,
अर्थ व वनेमंत्री, महाराष्ट्र