राज्यात १६ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; दिवाळी कशी होणार साजरी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:38 IST2025-10-07T15:35:12+5:302025-10-07T15:38:36+5:30
Amravati : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

Crisis over salaries of 16 lakh employees in the state; How will Diwali be celebrated?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाच्या ३९ विभागांमध्ये कार्यरत १६ लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार मिळालेला नाही. अर्थ विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही, हे वास्तव आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगाराविना राहण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सेवार्थ प्रणालीद्वारे अदा होत असताना ऐन दिवाळीच्या पुढे सेवार्थ प्रणाली अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली?, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोषागार कार्यालयाचा नकार
राज्य शासनात ३९ शासकीय विभाग आणि २८ च्यावर महामंडळे कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये थेट जमा केले जाते. मात्र, पदांचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालयाने माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल संबंधित विभागांना परत केले नाही. १ तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असताना ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.
कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नाही
- कर्मचाऱ्यांच्या सेवा ऑनलाइन झाल्यामुळे राज्यात नेमके शासकीय कर्मचारी किती? या संख्येबाबत प्रशासन विभागात मेळ जुळत नाही.
- जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, असे कर्मचारी सेवा प्रणालीवर कार्यरत दिसतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीमधून बाहेर न काढल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
- आकृतिबंध याचासुद्धा ताळमेळ जुळत नाही. जोपर्यंत विभागाचे ३ प्रमुख अधिनस्थ कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन सेवार्थ प्रणालीवर ऑनलाइन करणार नाही, तोपर्यंत अशा विभागाचे वेतन होणार नसल्याचे समजते.
"राज्य शासनाच्या ऑगस्ट २०२५च्या एका आदेशानुसार शासन स्तरावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदांचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे विभाग प्रमुखांनी पदांचा ताळमेळ जुळवून तसे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, बहुतांश विभागाने सप्टेंबर पेड ऑगस्ट महिन्यात प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, वेतन अदा करणे थांबले आहे."
- अमोल ईखे, उपजिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती