"तुझ्या घरी येऊन.. " दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचा संशय वाढला; ब्रेकअपनंतर केली प्रेयसीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 18:51 IST2026-02-28T18:50:49+5:302026-02-28T18:51:38+5:30
Amravati : ब्रेकअप झाल्यानंतरही डोक्यात संशयाचे भूत शिरलेल्या एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीला भर रस्त्यात अडवून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

"Come to your house.." Suspicion of having an affair with another boy increased; He beat his girlfriend after breakup
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ब्रेकअप झाल्यानंतरही डोक्यात संशयाचे भूत शिरलेल्या एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीला भर रस्त्यात अडवून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी २६ फेब्रुवारी रोजी आरोपी अनिकेत संजय धनद्रवे (वय २५, रा. विलास नगर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. बडनेरा रोडवरील शाळेपासून ते थेट शंकरनगर येथील एका कोचिंग क्लासपर्यंत त्याने त्या १९ वर्षीय तरुणीचा पाठलाग केला.
एफआयआरनुसार, पीडित तरुणी आणि संशयित अनिकेतने यांच्यात मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. मात्र, काही दिवसांपासून तो तिच्यावर विनाकारण संशय घेत होता. याच संशयाला कंटाळून तरुणीने त्याच्याशी ब्रेकअप केले होते. मात्र, अनिकेतला हा नकार पचवता आला नाही. घटनेच्या दिवशी अर्थात २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ही तरुणी क्लासला जात असताना अनिकेतने तिचा पाठलाग केला. तिला वाटेत अडवून तू माझ्याशी का बोलत नाहीस? माझा फोन का उचलत नाहीस?, असा जाब विचारत गोंधळ घातला. इतक्यावरच तो थांबला नाही, तर तिच्यावर दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याचा संशय घेत तिला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने रस्त्यावरून तिचा फोन तपासला.
घरात शिरून धिंगाणा घालण्याची धमकी
रागाच्या भरात अनिकेतने तरुणीचा पाच हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला आणि तो फोडला. जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीत, तर तुला जिवे मारून टाकेन, तुझ्या घरी येऊन तमाशा करीन, अशी उघड धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली असून, तिने तातडीने राजापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या काळे करीत आहेत.