मेळघाटात ढगफुटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:01 IST2021-07-23T05:00:00+5:302021-07-23T05:01:01+5:30
चिखलदरा/परतवाडा/धारणी : बुधवारी मध्यरात्री मुसळधार बरसलेल्या पावसामुळे मेळघाटच्या धारणी-चिखलदरा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आदिवासी पाड्यांना जोडणारे अनेक ...

मेळघाटात ढगफुटी!
चिखलदरा/परतवाडा/धारणी : बुधवारी मध्यरात्री मुसळधार बरसलेल्या पावसामुळे मेळघाटच्या धारणी-चिखलदरा तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आदिवासी पाड्यांना जोडणारे अनेक मार्ग बंद पडले असून, नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने परतवाडा-इंदूर आंतरराज्य महामार्गही बंद पडला.
लोकमत चमू
लोकमत न्यूज नेटवर्क
मेळघाटात बुधवारी मध्यरात्रीपासूनच ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस धो-धो कोसळला. त्याचा फटका आदिवासी पाडे, तालुका मुख्यालय व आंतरराज्य महामार्गाला बसला. गुरुवारी दुपारपर्यंत पूर्णतः वाहतूक ठप्प होती. सेमाडोह येथे सिपना नदीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले. येथील भूतखोरा आणि निसर्ग निर्वाचन संकुलकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद होते. सिपना नदीवरील या दोन्ही पुलांवर नदीच्या पूरस्थितीमुळे पाणी ओसंडून वाहत होते. परतवाडा-धारणी-इंदूर मार्ग बंद होता. सेमाडोह गावात अनेक झाडे उन्मळून पडल्याने वीज खांबसुद्धा वाकून कोसळले, तार तुटल्या. परिणामी विद्युत पुरवठा खंडित झाला. दुसरीकडे घटांग ते काटकुंभ-डोमा मार्गावर कुकरूनजीक दरड कोसळली, तर सलोना ते चिखलदरा मार्गावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. जामूननाला-कामापूर गावानजीक उन्मळून पडलेले झाड सलोना येथील रस्त्याने जाणारे कैलास हरसुले, राजा शेळके, नरेश वाघमारे, राजेश कासदेकर, योगेश शेलके, बबलू झमरकर या युवकांनी कापून बाजूला केले व रेशन धान्य घेऊन जाणाऱ्या वाहनासह सिलिंडर व प्रवासी वाहतूक सुरळीत झाली.
धारणीतील ५० गावे संपर्कविहीन
धारणीपासून आठ किलोमीटर अंतरावरील उतावली गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीचे धारणीकडे येणाऱ्या पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला. त्यामुळे हरदोली, पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, पाटिया आठनादा, तर दिया या गावाजवळील पुलावर सिपना नदीला पूर आल्यामुळे धारणामहू, केकदा, चटवाबोड, भोंडीलावा, काटकुंभ, बुलम, बैरागड, कुटांगा, सावलखेडा, रंगुबेली या गावांसह अन्य गावांना धारणी मुख्यालयापासून तोडले. अमरावती, नागपूर व मध्य प्रदेशातील खंडवा, बऱ्हाणपूर व इंदूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.